Join us

कारवाईसाठी जाणाऱ्या पी-उत्तरच्या पथकावर दगडफेक करण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :मालाडच्या कोकणीपाड्यातील पालिकेच्या जमिनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने केलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पालिका पी-उत्तरला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई :

मालाडच्या कोकणीपाड्यातील पालिकेच्या जमिनीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने केलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी पालिका पी-उत्तरला दिलेला पोलीस बंदोबस्त काढून घेण्यासाठी एका मंत्र्याने फोन केल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने उघड केले होते. त्यानुसार पुन्हा कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पी/उत्तरच्या पथकावर दगडफेक करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मालाड पूर्वच्या शांताराम तलाव येथील पुलाच्या खालील ४०० ते ५०० स्क्वेअर फूट पालिकेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक अजित रावराणे यांनी गोडाऊन बनवत त्याठिकाणी ऑक्सिजन सिलिंडरचा काळाबाजार करत दारूपार्टी झोडत अश्लील चाळे सुरू असल्याचा आरोप भाजपचे विनोद मिश्रा यांनी केला होता. तसेच पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांना पत्र लिहीत कारवाईची मागणी केली होती.

आयुक्तांच्या आदेशानुसार पालिकेच्या मालकीची जागा परत मिळवण्यासाठी त्यावरील अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरविण्याच्या कारवाईसाठी पोलीस परवानगी मिळवत अन्य तयारी करण्याचे निर्देश दगडखैर यांनी कार्यकारी अभियंता राजेश अक्रे आणि पथकाला ९ सप्टेंबर रोजी दिले होते. त्यानुसार गुरुवारी २३ सप्टेंबर रोजी हे बांधकाम निष्काशीत केले जाणार आहे. मात्र, ही कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकावर दगडफेक करण्याच्या धमक्या पालिकेला मिळत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ठाण्यातील कल्पिता पिंपळे हल्ला प्रकरण ताजे असताना आधी पोलीस बंदोबस्त काढून घेणे आणि त्यानंतर पालिकेला धमक्या देण्याच्या प्रकरामुळे पी-उत्तरच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

धमक्यांना भीक घालणार नाही

पालिकेच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करणारे स्टे मागण्यासाठी कोर्टात धाव घेणार आहेत. त्यानुसार कोर्टाने कारवाई रोखण्याचे आदेश दिल्यास आम्ही त्याचे पालन करू. अन्यथा कोणाच्याही धमक्यांना भीक न घालता तोडक कारवाई करण्यात येईल.

मकरंद दगडखैर, सहायक आयुक्त, पी-उत्तर विभाग