Join us  

'बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते'; चंद्रकांत पाटलांनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 11:56 PM

ज्यावेळेला ढाचा पडला, तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं की, होय याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय

मुंबई - अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जीदच्या जागेचा तिढा आता सुटला असून लवकरच अयोध्येत भव्य राम मंदिर उभारत आहे. तर, अयोध्येत मशिदीसाठीही जागा देण्यात आली आहे. मात्र, राम मंदिर आणि अयोध्या म्हटलं की १९९३ सालच्या बाबरी मस्जिद घटनेची आठवण झाल्याशिवाया राहत नाही. कारसेवक बनून तेव्हा अनेकजण अयोध्येला गेले होते. राज्याचे मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही मशिदीचा ढाचा पाडला त्यावेळीच्या काही आठवणी सांगितल्या. तसेच, ढाचा पाडायला गेलेल्यांध्ये एकही शिवसैनिका नव्हता, शिवसेना नव्हती, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

ज्यावेळेला ढाचा पडला, तेव्हा बाळासाहेबांनी म्हटलं की, होय याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय, बाळासाहेब तिथे गेले होते, का शिवसेना तिथे गेली होती?, का बजरंग दल तिथे गेला होता?, असा सवाल भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचारलाय. झी २४ तास या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्याप्रसंगीच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

अयोध्येला गेलेले कारसेवक हे हिंदू होते, ते बजरंग दल आणि दुर्गावहिनींच्या नेतृत्त्वात तिथे गेले होते. ते असं म्हटले नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. बाबरी ज्यांनी पाडली ते कदापी शिवसैनिक नव्हते, मला महिनाभर तिथं नेऊन ठेवलं होतं. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी, आता विधानपरिषदेत असलेले हरेंद्र धुमाळ आणि मी असे तीन राष्ट्रीय सरचिटणीस आहोत, नियोजनासाठी आमच्या तिघांची तेथे उपस्थिती होती. आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की, काहीही होवो, ढाचा पडो ना पडो, पण शेवटचा माणूस बाहेर पडल्यानंतरच तुम्ही तेथून बाहेर यायचं. त्यामुळे, जेव्हा आम्ही तेथून बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर कुत्री भुंकत होती, अशी आठवण चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतरची जाहीरपणे सांगितली. तसेच, अशा वातावरणात काम केलेले आम्ही, मग स्वर्गीय बाळासाहेबांनी म्हटलं की ही जबाबदारी मी घेतो, पण तुम्ही काय तिथे तुमचे ४ सरदार पाठवून दिले होते का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.   

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानामुळे आता शिवसेना आणि भाजपात संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण, बाळासाहेबांचा आणि शिवसेनेचा बाबरीच्या घटनेत कुठलाही सहभाग नसल्याचं पाटील यांनी म्हटलंय. सध्या, राज्यात शिवसेना आणि भाजप युतीतून सत्ता स्थापन झालीय. तर, ठाकरे गटातील नेतेही भाजपवर कायमच टीका करत आहेत. 

टॅग्स :शिवसेनाचंद्रकांत पाटीलबाबरी मस्जिदअयोध्या