Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्यांना नाही वाली त्यांना देतात मुखाग्नी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:09 IST

‘ते’ रोज मरणाच्या दारातूनच करतात ये-जा; खाकीतील हिरोने ५०० कोरोना बाधित मृतदेहांना दिला अग्नीमनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क...

‘ते’ रोज मरणाच्या दारातूनच करतात ये-जा; खाकीतील हिरोने ५०० कोरोना बाधित मृतदेहांना दिला अग्नी

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शवागृहातून बेवारस मृतदेह ताब्यात घ्यायचा. कुजलेला, छिन्नविछिन्न झालेल्या त्याच्या शरीराचे भाग उचलून ते शववाहिनीत ठेवून स्मशानाची वाट धरायची. कधी मुलगा, कधी बाप तर, कधी भाऊ बनून मृतदेहांंना अग्नी द्यायचा, हा जणू त्यांचा दिनक्रमच. मुंबई पोलीस दलातील अंमलदार ज्ञानदेव वारे (५२) यांच्या या अविरत सेवेला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. या सेवेत त्यांनी १ लाखांहून अधिक बेवारस मृतदेहांंना अग्नी दिला. कोरोना काळातही मरणाच्या दारातील त्यांची ही सेवा अविरत सुरू आहे. त्यांनी ५०० कोरोनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

ताडदेव पोलीस ठाण्याशी संलग्न असलेले ज्ञानदेव वारे हे १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात रूजू झाले. चेंबूरमध्ये ते पत्नी, मुलगी आणि मुलासोबत राहतात. सुरुवातीची ६ वर्षे त्यांनी पोलीस ठाण्यात सेवा बजावली. २००० मध्ये रजेवरून कर्तव्यावर रूजू होताच त्यांना शववाहिनीवर चालक म्हणून जबाबदारी दिली. वारे सांगतात, सुरुवातीला हात थरथरले. भीती वाटली. नकळतपणे रडलो. तापाने फणफणलो. झोप उडाली. भूकही लागेना. रात्री - अपरात्री स्वप्नात फक्त मृतदेहच दिसत होते. त्यावेळी थांबू की पुढे जाऊ, असा प्रश्न स्वतःलाच केला. हीदेखील एक सेवाच असल्याचे मनाला समजावून काम सुरूच ठेवले. कुठल्या अनोळखी व्यक्तिला आपण त्याचा जवळचा नातेवाईक म्हणून अग्नी देतो, याचे माेल केलेच जाऊ शकत नाही. यातून खूप माेठे समाधान मिळते, असे ते म्हणाले.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जिथे रक्ताचे नातेवाईकही दुरावले, अशावेळी केवळ तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घालून ५०० कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. हिंदूचे हिंदू धर्मानुसार, तर मुस्लिम बांधवांचे बडा कब्रस्तान येथे दफनविधी केले. बुधवाऱीही ८ बेवारस मृतदेहाना त्यांनी अग्नी दिल्याचे वारे म्हणाले.

* मुंबईत अवघ्या ३ शववाहिन्या कार्यरत

पूर्वी १२ परिमंडळसाठी १२ शववाहिन्या कार्यरत होत्या. सध्या फक्त ३ शववाहिन्या कार्यरत आहेत.

* अजूनही शेकडो बेवारस मृतदेह प्रतीक्षेत

वारे यांच्यावर दक्षिण आणि मध्य मुंबईची जबाबदारी आहे. याअंतर्गत जे. जे., नायर, केईएम, सायन, कामा, शिवडी, जीटीबीसारखी महत्त्वाची रुग्णालये आहेत. त्यामुळे दिवसाआड ५ ते ६ बेवारस मृतदेहांवर वारे हे अंत्यसंस्कार करतात. जे. जे. रुग्णालयात १००, सायनमध्ये ६५, नायर ३० ते ३५, केईएम ४० बेवारस मृतदेह अजूनही अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत आहेत.

* टोकन नंबरचा आधार

अनेक महिन्यांपासून शवागृहात पडून असलेल्या मृतदेहांपैकी काही कुजल्यामुळे त्यांची ओळख पटणेही अशक्य असते. तेव्हा, मृतदेहावरील टोकन क्रमांकानुसार अंत्यविधी पार पाडला जाताे, असे वारे यांनी सांगितले.

.........................................