Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ तीन नगरसेवकांची हायकोर्टात धाव

By admin | Updated: November 29, 2015 01:24 IST

बेकायदेशीर बांधकामे उभारल्याबद्दल व त्यांना संरक्षण दिल्याबद्दल ठाणे महापालिकेने (ठामपा) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शैलेश पाटील, शिवसेनेचे राम एगदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर

मुंबई : बेकायदेशीर बांधकामे उभारल्याबद्दल व त्यांना संरक्षण दिल्याबद्दल ठाणे महापालिकेने (ठामपा) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शैलेश पाटील, शिवसेनेचे राम एगदे व राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर साळवी या तीन नगरसेवकांना अपात्र ठरवले. त्याविरुद्ध या तिन्ही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. शैलेश पाटील, राम एगदे आणि मनोहर साळवी हे तिन्ही नगरसेवक बेकायदेशीर बांधकामात आणि अशा बांधकामांना संरक्षण देत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने ३ नोव्हेंबर रोजी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी महाराष्ट्र महापालिका कायद्याच्या कलम १० (१) (डी) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या विशेषाधिकारांचा वापर करत तिन्ही नगरसेवकांना अपात्र ठरवले. या निर्णयाला तिन्ही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत शैलेश पाटील यांची रिक्त जागा न भरण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने ठामपाला दिले आहेत. पाटील हे दिव्याचे नगरसेवक असून त्यांनी स्वत:च्या मालकीच्या जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम उभारल्याचा आरोप त्यांच्यावर ठामपाने ठेवला आहे. तर एगदे हे खोपटचे नगरसेवक असून त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे संपत्ती विकत घेतली तर साळवी यांनी कळव्यातील मनीषा नगर येथे महापालिकेने बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध हाती घेतलेल्या मोहिमेमध्ये अडथळा निर्माण करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.ठाणे महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे नगरसेवकांना अपात्र ठरवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)