Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेची आणखी एक संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:06 IST

चक्रीवादळामुळे परीक्षा हुकलेल्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा दिलासालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम ...

चक्रीवादळामुळे परीक्षा हुकलेल्यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : चक्रीवादळाच्या आपत्तीमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी काळजी करू नये. संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यानुसार संबंधित महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या राहिलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करील अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

सोमवारी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘तौउते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला आणि त्यामुळे प्रचंड वारा, पाऊस यांचा सामना करावा लागला. यादरम्यान अनेक ठिकाणी वीज खंडित होणे, इंटरनेट आणि फोन नेटवर्क अस्थिर होणे अशा समस्यांचाही समावेश होता. अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालये लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेत असून, यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या समस्यांमुळे परीक्षांना मुकावे लागल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाला मिळाली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील संबंधित शैक्षणिक संस्था, महाविद्यालये व विद्यापीठांना लवकरच त्याप्रमाणे सूचना केल्या जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.

महाविद्यालयांना विद्यापीठ आपत्कालीन निधीतून मदत करावी

चक्रीवादळाच्या तडाख्याने मुंबई, मराठवाडा, नांदेड विद्यापीठ अखत्यारीत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या महाविद्यालयांचे अतोनात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. सदर महाविद्यालयांना विद्यापीठ आपत्कालीन व्यवस्थापन, तसेच शासनाच्या निधीतून तत्काळ मदत करण्याची मागणी मुंबई विद्यापीठाच्या युवासेना सिनेट सदस्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे पत्र पाठवून केली आहे. लवकरच ते यासंदर्भात मंत्र्यांची भेट घेणार असून, आपले निवेदन सादर करणार असल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली.

................................................