कल्याण : दहशतवादावर साकारलेल्या देखाव्याला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्याने विजय तरुण मंडळाला दिलासा मिळाला आहे. या वादग्रस्त देखाव्याला हरकत घेत एमएफसी पोलिसांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली होती. या नोटिसीला मंडळाचे सल्लागार विजय साळवी यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. मंडळाने यंदा ‘तरुणांमधील वाढता दहशतवाद’ या विषयावर देखावा साकारला आहे. या देखाव्यात कल्याण शहरातील काही तरुण इराकमधील इसीस या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याच्या घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. हा देखावा वादग्रस्त असून समाजात तेढ निर्माण करणारा असल्याचे कारण देत पोलिसांनी नोटीस बजावून देखाव्याच्या प्रसारणाला बंदी केली होती. या नोटिसीविरोधात बुधवारी साळवी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने मंडळाची बाजू ऐकून घेतली. यात देखावा दाखविण्यास अंतरिम परवानगी देण्यात आली. (प्रतिनिधी)
‘त्या’ वादग्रस्त देखाव्याला हिरवा कंदील
By admin | Updated: August 29, 2014 00:30 IST