Join us  

यंदा दोन हजारांची भाऊबीज मिळणार! रक्कम थेट सेविकांच्या खात्यात जमा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 2:18 PM

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी  घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला दोन हजार रुपयांची भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्य शासनाकडून ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत २०२३-२४ या वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनावरील कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेट वितरित करण्यात येणार आहे.  शहर उपनगरात सुमारे चार ते पाच हजार अंगणवाडी सेविका आहेत.

भाऊबीज भेटसाठी ३७ कोटी ३३ लाख २ हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय महिला व बालविकास विभागाने जाहीर केला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करून त्याद्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.

अंगणवाडी सेविकांचे कार्य

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो, हेच लक्षात घेऊन शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेत आहे. 

या मागण्यांचाही विचार करा

 मागील काही वर्षांपासून अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नती, नवीन मोबाईल फोनचे वाटप अशा विविध मागण्यांही प्रलंबित आहेत. मात्र, नुकत्याच एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासित केले आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनिसांच्या पदोन्नतीसाठीची कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाणार आहे.  अंगणवाडी सेविकांना मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देण्यात येणार असून अंगणवाडी ताईंच्या सुरक्षिततेसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा हप्ता केंद्र शासन भरणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

राज्य शासनाने भाऊबीजेची भेट देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, अनेक मागण्यांसाठीही राज्य शासनाने पुढाकार घेऊन पूर्तता करावी.- एम. ए. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

टॅग्स :मुंबई