Join us  

‘या’ बर्फामुळे कायमचे ‘गार’ व्हाल! मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ; उत्पादक, विक्रेते एफडीएच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 2:27 PM

अन्न सुरक्षा नियमानुसार खाद्य बर्फविक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे.

मुंबई : मॅकडॉनाल्ड्सच्या खाद्यपदार्थांमधील चीजचे प्रकरण ताजे असताना अन्य फास्ट फूड कंपन्याही एफडीएच्या रडारवर असताना आता अन्न व औषध प्रशासन विभागाने आपला मोर्चा दूषित बर्फाकडे वळविला आहे. मुंबईत दिवसा तापमान वाढत असल्याने शीतपेये, ज्यूस, बर्फाच्या गोळ्यांची मागणी वाढत आहे, तर दुसरीकडे काही फेरीवाले, रस्त्यांवरील विक्रेते दूषित बर्फाचा सर्रास वापर करून मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळत आहेत. अशा बर्फ उत्पादक, विक्रेत्यांवर आता कडक कारवाईसाठी एफडीएने विशेष मोहीम हाती घेतली आहे. अन्न सुरक्षा नियमानुसार खाद्य बर्फविक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. काही उत्पादक विनापरवाना व्यवसाय करतात.  बर्फाच्या उत्पादकाने खाण्यायोग्य नसलेल्या बर्फात निळा रंग न वापरल्यास अन्न सुरक्षेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दूषित बर्फामध्ये ई कोलाय या शरीराला घातक असलेल्या विषाणूचे प्रमाण माेठ्या प्रमाणात असू शकते. त्यामुळे शरीराला हानी पाेहाेचू शकते.

 ई कोलायमुळे वाढताेय आजार- ई कोलायमुळे मूत्रसंसर्गाचा धोका, जठर आणि आतड्याचा दाह या तक्रारी उद्भवतात. तसेच, यामुळे उलट्या होणे, मळमळणे, अशक्तपणा आणि ताप येऊ शकतो. बर्फ गोळे विक्रेत्यांच्या गाडी, स्टॉलवर नेहमीच अस्वच्छता असते.- त्यातच गोळा तयार करताना बर्फ लोखंडाच्या ब्लेडमधून किसला जातो. या गाडी, स्टॉलवर बऱ्याचदा रासायनिक रंगाच्या बाटल्या उघड्यावर ठेवलेल्या असतात. शिवाय बर्फाचे गोळे रस्त्यावर विकण्यात येत असल्यामुळे सूक्ष्म धुळीचे कण त्यात मोठ्या प्रमाणात मिसळलेले असतात. - यादृष्टीने हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणाऱ्या विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी सुरू केली असून, ही मोहीम वेगाने राबविण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास विविध कलमांनुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षा व पाच लाख रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शैलेश आढाव यांनी सांगितले. 

दर्जाहीन साहित्यांमुळे धोकाखाण्यायोग्य बर्फ हा पिण्याच्या पाण्याद्वारे बनवला जातो, तर कंपन्यांमध्ये तयार होणारा बर्फ औषधांचे पॅकेट जतन, मृतदेह टिकवण्यासाठी व अन्य वापरासाठी तयार केला जातो. रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी, सॅकरीनचा गोळा, बर्फाची कॅन्डी तयार केली जाते. यात मिसळणारे उच्च प्रतीचे रंग, साखर बर्फाचा गोळा विकणाऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.  त्यामुळेच कमी दर्जाचा रंग, सॅकरीनचा उपयोग केला जातो. 

यामुळे निळ्या रंगाचा वापरबर्फाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये तसेच उद्योगासाठीही केला जातो. मात्र औद्योगिक कारणास्तव वापरण्यात येणारा, पिण्यास अयोग्य असलेल्या पाण्यापासून तयार केलेला बर्फ खाद्यपदार्थातही वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. हा बर्फ ओळखता येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते, हे टाळण्यासाठी अखाद्य बर्फात निळा रंग टाकण्याबाबतचे निर्देश अन्न व सुरक्षा मानक प्राधिकरणाने दिले. 

टॅग्स :मुंबईएफडीए