देवरूख : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी मिनी बस भरधाव वेगात झाडावर आदळली. या अपघातात ६ जण गंभीर, तर १२ जण किरकोळ जखमी झाले. हा अपघात सोमवारी सकाळी ६ वाजता संगमेश्वरजवळच्या धामणी येथे घडला. महामार्गावरील वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.संगमेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक शैलेश काशिराम जोशी (३५, मुंबई) हा आपल्या ताब्यातील मंगलमूर्ती टुर्स अँड ट्रॅव्हल्सची मिनी बस (एमएच - 0४ जी ९५४४) घेऊन प्रवास करत होता. क्लिनर नीलेश किसन म्हात्रे (२९, डोंबिवली) याच्यासह १९ प्रवासी घेऊन डोंबिवली ते कुडाळ असा त्यांचा प्रवास सुरू होता. सोमवारी सकाळी ६ वाजता ही गाडी भरधाव वेगात संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे आली असता चालकाला झोप अनावर झाली. डुलकी आल्याने गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजुला असणाऱ्या झाडावर आदळली आणि जागीच पलटी झाली. ही धडक एवढी जोरात होती की, गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. या अपघातात चालक शैलेशसह क्लिनर नीलेश तसेच प्रवासी शीतल शांताराम कवचे (४०, विरार), प्रणाली प्रदीप कानडे (५५, मालाड), जगदीश मोहन पांचाळ (२०, सांताक्रुझ), अनिल अशोक चव्हाण (४१, डोंबिवली) हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजताच नरेंद्र महाराज संस्थानची रुग्णवाहिका घेऊन चालक प्रसाद सप्रे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीच या गंभीर जखमींना पोलिसांच्या मदतीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या अपघातात परी दिनेश जाधव (दीड वर्षे, नायगाव), जयराम विष्णू घेवडे (३९, कांदिवली), हर्षदा महेंद्र तिर्लोटकर (२५, नायगाव), महेंद्र श्रीराम तिर्लोटकर (२५, नायगाव), शंकर रामचंद्र भुवड (३५, मुंबई), साहील शंकर भुवड (१३, मुंबई), हर्षाली शांताराम कवचे (१८, विरार), प्रतिभा प्रदीप कानडे (१९, मालाड), प्रदीप केशव कानडे (५५, मालाड), श्रध्दा प्रशांत पाटणकर (३०, सांताक्रुझ), प्रज्ञेश प्रदीप कानडे (२४, मालाड), जयश्री म्हापसेकर (५२, काळाचौकी) असे १२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्वांवर संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले. अपघातानंतर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती क्लिनर नीलेश म्हात्रे याने संगमेश्वर पोलिसांना दिली. पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
धामणी मिनीबस उलटून १२ जखमी
By admin | Updated: May 13, 2015 00:56 IST