Join us  

लोकलमधून प्रवास करताना फिजिकल डिस्टंन्सिंगचे तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 6:26 PM

मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या धोक्यातून प्रवास

मुंबई : लॉकडाऊन काळात मध्य रेल्वे मार्गावरून फक्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या सुरु केल्या आहेत. कारशेड आणि रेल्वे मुख्यालय कार्यालयात  जाण्यासाठी रेल्वे कर्मचारी या लोकलचा वापर करत आहेत. मात्र या लोकलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांचा कोरोनाच्या धोक्यातून प्रवास होत आहे. लोकलमधून प्रवास करताना फिजिकल डिस्टंन्सिंगचा तीनतेरा वाजले आहेत.

लॉकडाऊनमुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे मंत्रालयाने श्रमिक विशेष ट्रेन सोडल्या आहे. यासह आता अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे मंत्रालयाने १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार दररोज १०० ट्रेनच्या २०० फेऱ्या सुरु करण्याची घोषणा रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वर्कशाॅप मधील कर्मचारी, देखभाल दुरूस्तीचे कर्मचारी, रेल्वे स्टेशनवर काम करणारे कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना कामावर येण्यासाठी मध्य रेल्वेकडून कर्जत ते सीएसएमटी, कसारा ते सीएसएमटी आणि पनवेल ते सीएसएमटी अशा एकूण १४ लोकल फेऱ्या चालविण्यात येत आहे. मात्र कर्मचारी संख्या जास्त असल्यामुळे  रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये आसन मिळत नाही. त्यामुळे उभे राहून प्रवास करावा लागत असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतुन समोर आली आहे. यासह फिजिकल डिस्टंन्सिंग पालन होत नसल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे.  

लॉकडाऊन नंतर मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारपासुन पहिली विशेष लोकल चालविण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्मचारी जास्त आणि लोकल कमी असल्यामुळे शुक्रवारी रेल्वे कर्मचाऱ्यांची कर्तव्यांवर जात असताना लोकलचा गर्दीचा सामना करावा लागला आहे. प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनीच कर्मचाऱ्यांच्या गर्दीचे व्हिडीओ शुक्रवारी सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ कल्याण रेल्वे स्थानकांवरचा आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांची ड्युटी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांची असते. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सकाळी एकच लोकल असल्याने या लोकल मध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशी माहिती प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचारी दिली लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकांवर पूर्णपणे फुल्ल होते. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी सकाळी ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल फेऱ्या वाढविण्याची मागणी मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.

-------------------------  

रेल्वेचे लोअर परळ वर्कशॉप, महालक्ष्मी वर्कशॉप, मुंबई सेंट्रल, कोरशेड व  कोच केअर सेंटर आणि  बांद्रा टर्मिल्स कोच केअर सेंटर येत्या दोन ते तीन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. या  वर्कशॉप आणि  कोच केअर सेंटर काम करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सुद्धा लोकल फेऱ्या आता वाढविण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. 

-------------------------

वेळोवेळी रेल्वे कर्मचाऱ्यांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचना दिल्या जात आहे. त्यामुळे सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुचनांचे पालन करून सहकार्य करावे -  ए. के. जैन, वरिष्ठ जनसपंर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

  -------------------------

रेल्वे प्रशासनाला आधीच सांगण्यात आले होते कि, लोकल सेवा वाढवा. मात्र तसे झाले नाही. रेल्वे कर्मचारी कोरोनाच्या धोक्यातून प्रवास करत आहेत. रेल्वे मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोलाविले आहे. त्यामुळे १०० टक्के कर्मचारी हजर झाल्याने लोकल मध्ये गर्दी वाढली आहे. रेल्वेने यावर त्वरित सकारात्मक कृती करावी. 

- वेणू नायर, महामंत्री, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन 

टॅग्स :लोकलमुंबईकोरोना वायरस बातम्या