Join us

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तिसऱ्या डोळ्याचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रस्त्यावर वाहतूक पोलीस नाही म्हणत, सुसाट वाहने चालवणाऱ्यांवर पोलिसांच्या सीसीटीव्हीचा वॉच आहे. त्यामुळे ई-चलानद्वारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रस्त्यावर वाहतूक पोलीस नाही म्हणत, सुसाट वाहने चालवणाऱ्यांवर पोलिसांच्या सीसीटीव्हीचा वॉच आहे. त्यामुळे ई-चलानद्वारे केल्या जाणाऱ्या कारवाईचा वेग वाढत असल्याने, अनेकांनी या तिसऱ्या डोळ्याची धास्ती घेतल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

मुंबईतील वाहतूक व्यवस्था अत्याधुनिक आणि अधिक सुसज्ज करण्यासाठी वाहतूक विभागाकडून नवनवीन प्रकल्प राबविण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून ई-चलान, ई-पेमेंट, सीसीटीव्ही यंत्रणेतून वाहतुकीवर नजर यासाठी तयार केलेल्या एमटीपी ॲपचा सध्या वापर करण्यात येत आहेत.

गेल्या वर्षी मुंबईत ४६ लाख ५१ हजार ८९७ ई-चलानद्वारे १२८ कोटी ५८ लाख, ४४ हजार ६५५ रुपयांचा दंड आकारण्यात आला. यात, सीसीटीव्हीच्या मदतीने बजावण्यात आलेल्या २ लाख ५६ हजार ५७५ ई-चलानद्वारे ७ कोटी ६९ लाख ८८ हजार ५०० रुपयांची रक्कम भरण्यात आली आहे, तर ९ लाख १७ हजार ७४३ ई-चलनाची २४ कोटी, ७९ लाख ५९ हजार १०० रुपये दंड भरण्यात आलेला नाही.

तर या वर्षी १ जानेवारी ते ३१ जुलैदरम्यान मुंबईत एकूण २३ लाख १ हजार ९४७ ई-चलानद्वारे ७७ कोटी २५ लाख ३६ हजार १५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यात सीसीटीव्हीच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ४ लाख ३४ हजार ७५ ई-चलान पाठविण्यात आले. त्यापैकी फक्त ३५ हजार ८५७ ई-चलनाद्वारे आकारण्यात आलेल्या दंडाची १ कोटी ३२ लाख १३ हजार ३०० इतकी रक्कम भरण्यात आली.

...

मुंबईकरांनी थकवली ४० टक्के दंडाची रक्कम

राज्यभरात वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्यांनी ७०० कोटी रुपयांची दंडाची रक्कम थकवली आहे. त्यापैकी मुंबईकरांनी ४० टक्के म्हणजेच २८० कोटी रुपयांचा दंड थकविल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

....

चुकीचे पत्ते आणि मोबाइल क्रमांकही...

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांपैकी बऱ्याच प्रकरणांमध्ये चालकांची ओळख पटत नाही. राहण्याचे ठिकाण आणि मोबाइल क्रमांकही बऱ्याचदा चुकीचा असतो. त्यामुळे दंड वसूल करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. येत्या काही दिवसांत दंडवसुलीसाठी स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सीस्टिम तयार करण्याची परिवहन विभागाची योजना आहे. गरज पडल्यास वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने तीन ते सहा महिन्यांसाठी निलंबित करू आणि गंभीर परिस्थितीत आम्ही ते रद्द करू, अशीही कठोर भूमिका परिवहन विभागाकड़ून घेण्यात आली आहे.

....

२०१९

४६, ५१, ८९७ ई-चलानद्वारे १,२८, ५८, ४४, ६५५ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

...

२०२० जुलैपर्यंत

२३,०१, ९४७ ई-चलान

...

मुंबईकरांना हेल्मेटचा कंटाळा

यात विनाहेल्मेट, सिग्नल तोडणे याचे प्रमाण अधिक आहे.

....