मुंबई : अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या चर्चजवळ एका महिलेची दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून रिक्षातून एका चोराने पळ काढला होता. या चोरीची तक्रार इ-मेलद्वारे ‘वॉच डॉग फाउंडेशन’ने पोलीस आयुक्तांना केली आणि अवघ्या तीन दिवसांत एमआयडीसी पोलिसांनी या चोरीचा उलगडा करीत मुद्देमालासह तिघांना अटक केली. ज्यात एका रिक्षाचालकाचाही समावेश आहे. तर अन्य एका आरोपीचा शोध सुरू आहे.वकील असलेल्या नॅन्सी पिमेंटा या रविवारी मरोळ चर्च रोड परिसरातून घराच्या दिशेने येत होत्या. त्या वेळी एका इसमाने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावली आणि रिक्षात बसून पळ काढला. याबाबत त्यांनी त्यांचे ओळखीचे वॉच डॉग फाउंडेशनचे निकोलस अल्मेडा यांना याबाबत कळविले. अल्मेडा यांनी पोलीस आयुक्तांना तक्रार केली. हा प्रकार एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडला. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी पोलीस उपनिरीक्षक शामहरी आयरे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार केली आणि त्या चोरांचा शोध सुरू झाला. मुख्य म्हणजे या चोरांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांकडे काहीच पुरावे हाती नव्हते. मात्र या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये ६१६४ हा रिक्षा क्रमांक सापडला. याबाबत तीन वेगवेगळ्या आरटीओंकडे चौकशी केली. त्याचदरम्यान वडाळा आरटीओमध्ये या रिक्षाच्या मालकाचा अर्धवट पत्ता मिळाला. तेव्हा या रिक्षासाठी ज्या बँकेत लोन काढण्यात आले त्यातून बाबू अण्णा या मालकाचा कुर्ल्यातील पत्ता मिळाला. बाबूने रिक्षा ही संजय चव्हाण नावाच्या इसमाला दिली होती. त्याला कुर्ला येथून पोलिसांनी शोधून काढले. त्याच्या चौकशीत सराईत गुन्हेगार अकबर पटेल, मुकेश जाधव आणि लियाकत अली उर्फ लिओ यांची नावे समोर आली. यात पटेलव्यतिरिक्त सर्वांच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे. तसेच चोरीला गेलेली सोनसाखळीदेखील पोलिसांनी हस्तगत केली. (प्रतिनिधी)
अर्धवट रिक्षा क्रमांकावरून उलगडली सोनसाखळी चोरी
By admin | Updated: April 28, 2017 02:45 IST