Join us  

जुहूत पीपीई किट घालून चोर आले! नागरिकांमध्ये भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 5:02 AM

जुहू विलेपार्ले योजना परिसरातील एका टॉवरच्या गेटकडे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पीपीई, मुखवटा, हातमोजे परिधान केलेल्या संशयित पाच व्यक्ती आल्या.

मुंबई : पीपीई किट घालून काही लोक जुहूमधील उच्चभ्रू सोसायटीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते, अशी अफवा असलेला मेसेज सर्वत्र फिरत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. मात्र असा काही प्रकार घडलेला नसून ही सर्व अफवा असल्याचे जुहू पोलिसांकडून सांगण्यात आले.जुहू विलेपार्ले योजना परिसरातील एका टॉवरच्या गेटकडे गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पीपीई, मुखवटा, हातमोजे परिधान केलेल्या संशयित पाच व्यक्ती आल्या. त्यांनी सुरक्षारक्षकास सांगितले की इमारतीत कोरोनाचा एक रुग्ण आहे आणि ते त्याला दवाखान्यात नेण्यासाठी आले आहेत. तेव्हा संबंधित रुग्णाचे नाव आणि माहिती सुरक्षारक्षकाने त्यांना विचारली. मात्र ते याबाबत काहीच सांगू न शकल्याने सुरक्षारक्षकाला त्यांच्यावर संशय आला. ते वारंवार त्याला मुख्य गेट उघडण्याचा आग्रह करत होते.त्यातील तिघांनी चेहरा झाकलेला आणि ग्लोव्हजसह पूर्ण पीपीई घातले होते. तर अन्य दोघे सैन्य पोशाख, मुखवटे आणि ग्लोव्हजमध्ये होते. मात्र जोपर्यंत सोसायटी सेक्रेटरी अधिकृतपणे सांगत नाहीत तोपर्यंत गेट उघडणार नाही, असे सुरक्षारक्षकाने सांगितले. इंटरकॉमवरून सेक्रेटरीला विचारणा करतो असे सुरक्षारक्षकाने त्यांना सांगितले. ते ऐकून गेट न उघडल्याच्या रागात त्यांनी सुरक्षारक्षकाला सुरुवातीला शिवीगाळ केली. सकाळी पुन्हा भेट देऊन रुग्णाला घेऊन जाऊ आणि सुरक्षारक्षकाला अटक करू, अशी धमकीही त्यांनी दिली आणि ते निघून गेले.सुरक्षारक्षकाने दुसऱ्या दिवशी सचिवांना हा प्रसंग सांगितला, पण आरोग्य कर्मचारी किंवा पोलिसांनी सोसायटीकडे संपर्क साधला नाही असे सेक्रेटरीने सांगितले. नंतर पालिकेकडूनही टॉवरमधील कोरोना रुग्णासंबंधी माहिती आलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच त्यांनी कोणालाही पाठवलेले नाही असेही नमूद करण्यात आले. त्यानुसार आरोग्य कर्मचारी म्हणून रात्रीच्या वेळी पीपीई किट घालून येणारे हे दरोडेखोर, घरफोडी करणारे लोकही असू शकतात असे मेसेजमध्ये नमूद करत सोसायटी पदाधिकारी, सुरक्षा कर्मचाº­यांनी याबाबत सतर्क राहण्याचेही आवाहन करण्यात आले. त्यानुसार याप्रकरणी जुहू पोलिसांना विचारणा केली. तेव्हा अशी काही पोलीस ठाण्यात नोंद झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.‘सदर मेसेज हा फेक असून लोकांनी विनाकारण अशा अफवा पसरवू नयेत. तसेच अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवत तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचे जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ व्हावळ यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई