Join us  

पैसे किंवा दागिने नाही तर कपडे चोरणारा चोर मुंबईत सक्रीय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 12:46 PM

कांदिवली पोलीस सध्या एका अशा चोराचा शोध घेत आहेत जो घर आणि दुकानांमधून हजारो रुपये नाही तर शर्ट आणि पँट चोरी करत आहे

मुंबई - कांदिवली पोलीस सध्या एका अशा चोराचा शोध घेत आहेत जो घर आणि दुकानांमधून हजारो रुपये नाही तर शर्ट आणि पँट चोरी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी एस व्ही रोडवरील ज्ञानदर्शन बिल्डिंगमध्ये राहणा-या कापड व्यवसायिक कुणाल सोमानी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुणाल सोमानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दुकानातून 100 शर्ट, 150 जिन्स आणि 40 टी-शर्ट गायब झाले आहेत. चोरांनी इमारतीमधील दुकान क्रमांक 2,3,4 आणि 5 मधून ही चोरी केली आहे. 

चोरीच्या घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये कपडे चोरावरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तपास करणा-या पोलीस कर्मचा-याने दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पोलिसांनी दुकानाची पाहणी केली असता सीसीटीव्हीदेखील गायब झालं असल्याचं समोर आलं. चोरांनीच आपली चोरी सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद होऊ नये यासाठी सीसीटीव्ही चोरले असल्याचा अंदाज आहे. 

कुणाल सोमानी यांनी आपल्या तक्रारीत दुकानात ठेवलेले चांदीचे शिक्केही गायब झाले असल्याचा दावा केला आहे. दुकानाजवळ असणा-या सीसीटीव्हींच्या आधारे या रहस्यमय चोराचा शोध घेतला जात आहे अशी माहिती कांदिवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात कलम 457 आणि 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

विशेष म्हणजे, दुकानात हजारोंची रोख रक्कम असतानाही या कपडेचोराने फक्त 200 रुपये चोरले आहेत. कुणाला सोमानी यांनीही चोराने कपडे चोरण्याच्या उद्देशानेच चोरी केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी हा चोर फक्त कपडे चोरत असल्याची शक्यता वर्तवली आहे. 

टॅग्स :मुंबई पोलीस