Join us
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा कोटी चोरणारा आठ तासांत गजाआड

By admin | Updated: March 29, 2015 00:49 IST

मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासांत लॉजीकॅश कंपनीची सुमारे सव्वा कोटींची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपी चालकाला कल्याण स्थानकातून गजाआड केले.

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासांत लॉजीकॅश कंपनीची सुमारे सव्वा कोटींची रोकड चोरून पसार झालेल्या आरोपी चालकाला कल्याण स्थानकातून गजाआड केले. त्याने चोरलेली सर्वच रक्कम हस्तगतही केली. अमर सिंग (२४) असे या आरोपीचे नाव असून, त्याला न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. काल अणुशक्तीनगरातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या आवारात ही घटना घडली. लॉजीकॅश कंपनीच्या बेलापूर शाखेतून काल सकाळी सुमारे १ कोटी ४४ लाखांची रोकड घेऊन व्हॅन निघाली. ही व्हॅन मुंबईतल्या सुमारे वीसेक एटीएमवर ठरलेली रोकड भरणार होती. अणुशक्तीनगर येथे १६ लाखांची रोकड घेऊन व्हॅनमधले कंपनीचे कर्मचारी एटीएम मशिनमध्ये भरण्यासाठी खाली उतरले. ही संधी साधून अमर सिंग व्हॅनसोबत पसार झाला. पुढे ही व्हॅन माटुंग्याच्या डॉनबॉस्को शाळेजवळ बेवारस अवस्थेत सापडली. त्यातली १ कोटी २८ लाखांची रोकड गायब होती. आरोपी सिंगने डॉनबॉस्को शाळेजवळ व्हॅन थांबवून सव्वा कोटींची रोकड दोन बॅगांमध्ये भरून टॅक्सीने बेलापूर येथील घर गाठले. अर्धी रक्कम घरातच ठेऊन त्याने गावी पळ काढण्याचे ठरवले. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाकडूनही सुरू होता. कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे, एपीआय नितीन पाटील, फौजदार संजय पाटील, हवालदार दत्ता कुढले, नाईक प्रदीप नलावडे, शिपाई वीरेश सावंत, एम. मोकाशी, रावराणे, गायकवाड या पथकाने बिहार, उत्तर प्रदेशसाठी निघालेल्या मेल-एक्स्प्रेसवर पाळत ठेवली. तांत्रिक तपासात अमर सिंग कल्याण रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार काल रात्री दहाच्या सुमारास कल्याण स्थानकात् पथकाने अमर सिंगला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झाडाझडती घेतली, तेव्हा त्यात निम्मी रोकड आढळली. चौकशीअंती उर्वरित रोकड बेलापूर येथील त्याच्या घरातून हस्तगत करण्यात आली.चोरीनंतर दाढी काढलीगेल्या महिनाभरापासून चोरीचा कट आखणाऱ्या अमर सिंग याने हेतुपुरस्सर दाढी वाढवली होती. मात्र चोरी केल्यानंतर त्याने पहिल्याप्रथम दाढी काढली. पोलीस मागे लागणार याचा अंदाज त्याला होता. पोलिसांना चकवण्यासाठीच त्याने ही शक्कल लढवली,अशी माहिती मिळते.रोकड पाहून हाव सुटलीदहावीपर्यंत शिकलेला अमर सिंग तीन महिन्यांपूर्वीच बिहारहून मुंबईत आला होता. दोन महिने तो लॉजीकॅश कंपनीसोबत काम करीत होता. या काळात कंपनीची कोट्यवधींची रोकड एटीएम मशिनमध्ये भरणा करण्यासाठी बाहेर निघते़ ही रोकड आणपच वाहून नेतो, हे अमर सिंगच्या लक्षात आले होते. इतकी रोकड पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटले आणि ही रोकड आपल्याला मिळाल्यास गावी व्यवसाय करता येईल, कुटुंबासोबत चंगळ करता येईल अशी स्वप्ने त्याला पडू लागली. त्यानुसार महिनाभरापासून त्याने चोरीची योजना आखण्यास सुरुवात केली.कुटुंबासाठी केली खरेदीचोरलेली रोकड निम्मी सोबत घेऊन आरोपी सिंगने वाशी मार्केट गाठले. तेथे त्याने कुटुंबीयांसाठी कपडे, बूट आणि मोबाइल खरेदी केले. त्यानंतर ट्रेनेने तो कल्याण रेल्वे स्थानकात पोहोचला.