Join us
Daily Top 2Weekly Top 5

वायफाय कनेक्शन देण्याच्या बहाण्याने शिक्षकाच्या घरात शिरला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वायफाय कनेक्शन देण्याच्या बहाण्याने शिक्षकाच्या घरात चोर शिरल्याचा धक्कादायक प्रकार परेल परिसरात घडला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वायफाय कनेक्शन देण्याच्या बहाण्याने शिक्षकाच्या घरात चोर शिरल्याचा धक्कादायक प्रकार परेल परिसरात घडला. यात, चोराने घरातील लॅपटॉप पळविला असून, भोईवाड़ा पोलीस अधिक तपास करत आहेत.

परेल परिसरात ३० वर्षीय तक्रारदार कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. ते खासगी शिकवणीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ऑनलाइन शिक्षणासाठी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात लॅपटॉप विकत घेतला होता. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास एक तरुण त्यांच्याकडे आला. त्याने नवीन वायफाय सेवा सुरू केली असून, वायफाय पाहिजे आहे का, असे विचारले. वायफाय नको असल्याचे सांगताच तो निघून गेला. त्यानंतर ११.५० च्या सुमारास लॅपटॉप चार्जिंगला लावून तक्रारदार व्यायाम करण्यासाठी बाहेर पडले.

अर्ध्या तासाने त्यांच्या आईचा कॉल आला. तिने लॅपटॉप दिसत नसल्याचे सांगितल्याने ते घरी आले. लॅपटाॅप शोधला. मात्र तो घरात कुठेच सापडला नाही. वायफाय विचारण्यासाठी आलेल्यानेच लॅपटॉप चोरल्याची खात्री पटताच तक्रारदार यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, ते अधिक तपास करत आहेत.

.....................