Join us

मालाडच्या शाळेतील ‘ते’ तांदूळ प्लास्टिकचे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कथित प्लास्टिक तांदूळ पुरविल्याचा आरोप मालाडच्या शाळेने केला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कथित प्लास्टिक तांदूळ पुरविल्याचा आरोप मालाडच्या शाळेने केला होता. मात्र, पालिका प्रयोगशाळेचा अहवाल शिक्षण विभागाला मिळाला आहे. यात ते नमुने प्लास्टिकचे नसून फोर्टीफाइड (भक्कम आहार) असल्याचे उघड झाले आहे.

मालाडच्या पठाणवाडी उर्दू प्रायमरी अँड हायस्कूलच्या मुख्याध्यापिका शबाना शेख यांनी तांदूळ शिजल्यावर ते रबरप्रमाणे लागतात, तर बऱ्याचदा तांदूळ शिजलेच नसल्याच्या तक्रारी पालकांकडून मिळाल्याचे म्हटले होते. मुलांना असे अन्न देऊन त्यांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पालकांनी केल्याचेही त्या म्हणाल्या. त्यानुसार पालिकेने याची गंभीर दखल घेत तांदळाचे नमुने गोळा करत ते महानगरपालिकेच्या जी/उत्तर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. जवळपास दोन आठवड्यांनी त्याचा अहवाल शुक्रवारी शिक्षण विभागाला मिळाला. यात ते तांदूळ प्लास्टिकचे नसल्याचे उघड झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत कोणतीही भीती बाळगू नये, अशी विनंतीही केली आहे.

यापूर्वी देखील प्लास्टिक तांदूळ वितरित केल्याची तक्रार पालघर व अहमदनगरमध्ये मिळाली होती. याबाबत भारतीय अन्न महामंडळाकडून अभिप्राय घेत तक्रारीत तथ्य नसून, ते देखील फोर्टीफाईड तांदूळच असल्याचे उघड झाले होते.

शाळेचीही होणार चौकशी

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत ही शाळा येत असून, हा प्रकार घडल्याच्या तिसऱ्या दिवशीच आम्ही संबंधित विभागाला पत्र देत याची चौकशी करून शिक्षण विभागाला कळविण्यास सांगितले होते. त्यामुळे पालिकेची बदनामी करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

(अजय वाणी - उपशिक्षण अधिकारी)