पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लोककल्याणकारी कामे केली असून राज्यातही भाजपची सत्ता येणार हे निश्चित आहे. त्यामुळे देशातही परिवर्तनाची लाट येईल, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर यांचे कार्य कौतुकास्पद असून ते आमदारच नाहीत, तर महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात असतील, असे भाकीत भाजपचे नेते खासदार रविंद्र कुशवाह यांनी सोमवारी वर्तवले. येथील सिकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात सोमवारी प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत कुशवाह बोलत होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील, युवा नेते सुरेश सावंत, वाय. टी देशमुख, लक्ष्मण पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशात परिवर्तनाची लाट उसळली असून महाराष्ट्रातही कमळ फुलणार असल्याचा विश्वास रविंद्र कुशवाह यांनी व्यक्त केला. गरिबी हटावचा नारा देणाऱ्यांनी जनतेला अधिक गरीब केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. रामशेठ ठाकूर यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकीत ते म्हणाले की ते सामाजिक बांधिलकी मानणारे व्यक्तिमत्व आहे. गरीब गरजूंना मदत करणे हा रामशेठ ठाकूर यांचा स्वभाव असून रिकाम्या हाती कोणालाही न पाठवणे ही त्यांची ओळख आहे. त्यांचे हात मजबूत करण्यासाठी प्रशांत ठाकूर यांना आमदार करा, असे आवाहन त्यांनी केले. भाजप,आरपीआय व इतर घटकांची साथ असल्याने ठाकूर प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास जगदीश गायकवाड यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
देशात परिवर्तनाची लाट उसळेल
By admin | Updated: October 8, 2014 01:26 IST