Join us

मुंबई विद्यापीठाच्या आणखी दोन अधिसभा होणार - कुलगुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 06:07 IST

पहिल्याच दिवशी पदाधिकाऱ्यांत तांत्रिक मुद्द्यांवरून वाद, नवनिर्वाचित सदस्याकडून सभात्याग

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नियोजित दोन अधिसभा बैठकांशिवाय आणखी दोन अनधिकृत अधिसभा बैठका होतील, अशी घोषणा बुधवारी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी अर्थसंकल्पी अधिसभा बैठकीत केली. या बैठका जुलै आणि जानेवारीत घेण्यात येणार असून, सिनेट सदस्यांना त्यामध्ये आपले प्रश्न आणि समस्या मांडता येतील. या घोषणेने अधिसभा बैठकीचा पहिला दिवस पुढे ढकलला असला तरी सिनेट सदस्य आणि पदाधिकारी यांच्यातील तांत्रिक मुद्द्यांवरील वादामुळे अधिसभेला प्रारंभ झाल्यानंतर, केवळ अडीच तासांतच ती तहकूब करण्याची नामुष्की कुलगुरूंवर आली.मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पी अधिसभेला बुधवारी सुरुवात झाली. मात्र, फेब्रुवारीमध्ये विद्यापीठ कायद्याच्या अनुषंगाने नव्याने पारित केलेल्या परिनियमानुसार, सभागृहाचे कामकाज का नाही, जुन्या परिनियमानुसार अजेंडा का दिला, असे सवाल करत, अधिसभा सदस्यांनी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना धारेवर धरले. तर बुधवारच्या अधिसभेतील गोंधळ पाहून विद्यापीठाचे नवनिर्वाचित विधानसभा सदस्य संदीप नाईक यांनी सभात्याग केला. शिवाय अधिसभा बैठक एकच दिवस चालणार का, विद्यापीठाचा परिनियमानुसार बिगर अधिसभा सदस्यांची सभागृहातील उपस्थिती आदी प्रश्न सदस्यांनी उपस्थित केल्याने दिवसभराचे कामकाज वाया गेले.अधिसभा सदस्यांना अजेंडा देताना विद्यापीठ प्रशासनाने फेब्रुवारीत नवे परिनियम आले असतानाही जुन्या विद्यापीठाच्या कायद्याच्या परिनियमानुसार दिला. यामुळे अधिसभा सुरू झाल्यानंतर हरकतीचे मुद्दे उपस्थित करत, परिनियम नव्याने लागू असताना जुना का दिला, असा जोरदार आक्षेप शीतल देवरुखकर यांनी घेतला. यासोबत युवासेना सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, सुप्रिया कारंडे, राज्यपाल नियुक्त सदस्य सुधाकर तांबोळी, प्राध्यापकांमधून आलेले वैभव नरवडे, संजय शेटे यांनी जाब विचारत, अनेक प्रश्न उपस्थित करून कुलगुरूंसोबत कुलसचिव अजय देशमुख यांना धारेवर धरले.अधिसभेची कार्यक्रम सूची जुन्या परिनियमाप्रमाणे असल्याने विद्यापीठाने खुलासा करावा, अशी मागणी करत, सुरुवातीला सभागृहाचे पूर्ण कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे आणि नंतर एक तास सभागृह तहकूब करावे, अशी मागणी सिनेट सदस्यांनी केली. याला युवासेना आणि बुक्टू या प्राध्यापक संघटनेने पाठिंबा दिला. त्यामुळे कुलगुरूंना एक तासासाठी सभागृह तहकूब करावे लागले. सायंकाळी ५ वाजता अजेंड्यानुसार कामकाज सुरू करण्यास कुलगुरूंना यश मिळाले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कामकाज चालण्याची शक्यता असून, अर्थसंकल्प उशिरा सादर होईल, अशी अपेक्षा आहे.मुंबई विद्यापीठाला मराठीचे वावडेविद्यापीठाचेच अधिकारी मराठीतून पत्रव्यवहार न करता, इंग्रजीतून करत असल्याचा हरकतीचा मुद्दा राज्यपाल नियुक्त सदस्यसुधाकर तांबोळी यांनी उपस्थित केला. मराठीचा प्रचार व प्रसार हे विद्यापीठाचे आद्य कर्तव्य असून, तेथूनच त्याचे पालन होत नसेल, तर इतरांकडून काय अपेक्षा करणार, असा सूर सिनेट सदस्यांकडून आळवला गेला. त्यावर सभागृहात जोरदार चर्चा रंगली. इतकेच नाही, तर मराठीचा वापर करण्यावरून सिनेट सदस्य संगीता पवार आणि सुप्रिया कारंडे यांच्यातही ‘तू तू मैं मैं’ पाहायला मिळाली. विद्यापीठ प्रशासनाकडून यापुढे मराठीचा वापर केला जाईल, असे आश्वासन कुलसचिव अजय देशमुख यांनी दिले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठ