Join us

आग विझवणारे छोटे बंब येणार

By admin | Updated: June 21, 2016 02:43 IST

अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांतून आगीचे बंब घटनास्थळी नेण्यास अनंत अडचणी येत आहे़ आगीचे छोटे बंब आणण्याची कल्पना दोन वर्षांपूर्वी पुढे आली होती़

मुंबई : अरुंद रस्ते आणि चिंचोळ्या गल्ल्यांतून आगीचे बंब घटनास्थळी नेण्यास अनंत अडचणी येत आहे़ आगीचे छोटे बंब आणण्याची कल्पना दोन वर्षांपूर्वी पुढे आली होती़ मात्र बराच काळ लालफितीत अडकलेला हा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे़ त्यानुसार मिनी फायर टेंडर म्हणजेच आगीचे छोटे बंब अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत़ असे तीन बंब लवकरच खरेदी करण्यात येणार आहेत़काळबादेवी येथील इमारतीला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचे चार प्रमुख अधिकारी शहीद झाले़ खेटून उभ्या असलेल्या इमारती व अरुंद मार्गामुळे अग्निशमन दलावरच ही आपत्ती ओढावली़ याची गंभीर दखल घेऊन पालिकेच्या विशेष समितीने शहरात विविध ठिकाणी छोटे अग्निशमन केंद्र उभारण्याची शिफारस केली होती़ त्यानुसार आगीचे छोटे बंब खरेदी करण्यात येणार आहेत़काळबादेवी दुर्घटनेच्या आधीपासून मिनी फायर टेंडरचा प्रस्ताव चर्चेत होता़ मात्र हा प्रस्ताव प्रत्यक्षात स्थायी समितीपुढे येण्यास दीड ते दोन वर्षांचा कालावधी लोटला़ पहिल्या टप्प्यात तीन छोटे बंब खरेदी करण्यात येणार आहेत़ हे बंब चिंचोळ्या गल्ल्यांमधूनही रस्ता काढू शकतात़़ झोपडपट्टी व विशेषत: दक्षिण मुंबईतील इमारतींमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास या बंबाच्या मदतीने चिंचोळ्या मार्गांतून रस्ता काढणे शक्य होणार आहे़ (प्रतिनिधी)