Join us
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकलही होणार ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 13:20 IST

यात्री ॲपवर लाईव्ह ट्रॅकिंग सुविधा उद्यापासून

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेनंतर आता पश्चिम रेल्वेवर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सेवेत यात्री ॲप दाखल झाले आहे. पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या उपनगरीय लोकल सेवेचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना यात्री ॲपवर बघता येणार आहे. यात्री ॲपवर लाईव्ह ट्रॅकिंग सुविधा बुधवार पासून  सुरु होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, प्रवाशांना आता एका टचवर रेल्वे तिकीट बुक करता येणार आहे. यासाठी यात्री ॲप प्रवाशांच्या सेवेत येत असून पश्चिम रेल्वे प्रशासनाने आपल्या गाड्यांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस बसविले आहे. त्यामुळे यात्री ॲपवर प्रवाशांना लोकल ट्रेनचे रिअल-टाइम लाइव्ह लोकेशन कळण्यास मदत होणार आहे. एका टचवर प्रवाशांना ट्रेनचे लाइव्ह अपडेट्स आणि घोषणा, ताजे वेळापत्रक, प्रमुख रेल्वे स्थानकांचे नकाशे आणि त्यातील सुविधांबाबत माहिती मिळणार आहे. दरम्यान, दिव्यांग प्रवाशांना मोठी मदत होणार असून जे व्हॉईस कमांडद्वारे मोबाईल हाताळतात. ते गुगल असिस्टंटद्वारे त्यांच्या ट्रेनचे थेट लोकेशन सहज शोधू शकतात.

दोन वर्षांपासून यात्री ॲप

उपनगरी लोकल गाड्या वेळापत्रक आणि लाइव्ह लोकेशन जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून दोन वर्षांपूर्वी ॲप विकसित केले होते. मात्र, या ॲपवर फक्त रेल्वेचे वेळापत्रक दिसत होते. लोकल गाड्यांच्या रिअल टाईम ट्रॅकिंग सुविधा सुरु झाली नव्हती. त्यामुळे यात्री ॲप वापरणाऱ्या प्रवाशांना लोकल गाड्यांचे रियल टाईम स्टेटस कळत नव्हते. १३ जुलै २०२२ पासून मध्य रेल्वेने यात्री ॲपवरही सुविधा सुरू केली आहे.

टॅग्स :मुंबई लोकल