ठाणे : युनायटेड स्टेटस्मध्ये प्रामुख्याने कारखाने आणि वाहतुकीमुळे ध्वनी प्रदूषण होत असले तरी मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमध्ये मात्र उत्सवांमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचे निरीक्षण ध्वनीप्रदूषणाचा अभ्यास करत असलेले युनायटेड स्टेटस् मधील एन्थ्रोपोलॉजिस्ट ज्युलियन लिन्च यांनी नोंदवले आहे.ठाण्यासह मुंबईत सध्या ध्वनी प्रदूषणाच्या मुद्यावरुन राजकीय वादंग उठले आहे. किंबहुना हा विषय राजकीय विषय करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. ध्वनी प्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे ठाण्यातील दक्ष नागरिक डॉ. महेश बेडेकर यांनी अनेकवेळा कोर्टात जनहित याचिका दाखल केल्या असून त्यांच्या या लढ्याला यश आले आहे. ज्युलियन लिन्च यांनी मंगळवारी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कामाविषियी माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या देशातील आणि ठाणे शहरामध्ये प्रदूषण होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत याविषयी चर्चा देखील प्रसार माध्यमांशी केली. लीन्च हे ध्वनी प्रदूषणामुळे होणारे सामाजिक परिणाम या विषयावर पी.एच. डी करत असून सध्या ते ठाणे शहरामध्ये उत्सवादरम्यान होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाचा अभ्यास करत आहेत. युनायटेड स्टेटसमधील काही शहरांमध्ये फटाके वाजवण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच ज्या शहरांमध्ये फटाके वाजवण्यास परवानगी दिली आहे त्या ठिकाणीही आवाजाची मर्यादा ठरवून दिली आहे. ठाण्यात मात्र असे बंधन नसल्याने सर्वाधिक प्रदूषण गणशोत्सवात झाले असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मुंबई, ठाण्यात उत्सवांच्या काळात होते ध्वनिप्रदूषण
By admin | Updated: October 21, 2015 03:08 IST