Join us  

दारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून मित्राला फेकले वाशी खाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 1:08 AM

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून मित्रांनीच एका तरुणाला वाशी खाडीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला.

मुंबई : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून मित्रांनीच एका तरुणाला वाशी खाडीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार गोवंडी परिसरात उघडकीस आला. या प्रकरणी उर्फ टप्पू अर्जुन ढिलपे (२६) आणि कृष्णा उर्फ चम्या राजू सुतार (१९) यांना अटक करून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.गोवंडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ डिसेंबर रात्री १२च्या सुमारास गोवंडीच्या घाटला गावात राहणारा राजू गायकवाड याने वाशी खाडी पुलावरून पाण्यात उडी मारल्याची माहिती ढिलपेने गायकवाडच्या भावाला दिली. त्यानुसार, पोलिसांना याबाबत माहिती देत, भावाचा शोध सुरू केला. मात्र, सुरुवातीपासून तिघांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यांनी आरोपींकडेच उलटतपासणी सुरू केली. ८ डिसेंबर रोजी आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली.घटना अशी की, नेहमीप्रमाणे राजू अन्य तीन आरोपींसोबत गोवंडी रेल्वे स्थानकासमोरील बारमध्ये गेला. तेथे दारू प्यायल्यानंतर त्रिकुटाने त्याच्याकडे आणखीन दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र राजूने नकार दिल्याने त्रिकुटाने त्याच्या कानातली सोन्याची बाळी हिसकावली. याबाबत पोलिसांत तक्रार करणार असल्याचे राजूने तिघांना सांगितले. याच रागात त्याला स्कुटीवर बसवून ते वाशी खाडीच्या दिशेने निघाले. रस्त्यात त्यांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळीही काढून घेतली आणि त्याला वाशी खाडीत फेकून घर गाठल्याची माहिती उघड झाली. वाशी खाडीत राजू यांचा मृतदेह न मिळाल्याने पोलिसांनी सागरी पोलिसांकडे चौकशी केली, तेव्हा यलोगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, नातेवाइकांनी कपड्यावरून ओळख पटविली. या गुन्ह्यांत गोवंडी पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांना न्यायालयाने १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :गुन्हेगारीअटक