Join us

एसी लोकल धावण्यास अडचणी वाढल्या

By admin | Updated: November 9, 2016 04:20 IST

मध्य रेल्वे मार्गावरील काही स्थानकांदरम्यान रुळ हे अस्थिर असून एसी लोकलसाठी ते योग्य नाही. त्यामुळे ही लोकल धावण्यास अडचणी निर्माण होतानच त्यात तांत्रिक बिघाडही उद्भवू शकतात

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील काही स्थानकांदरम्यान रुळ हे अस्थिर असून एसी लोकलसाठी ते योग्य नाही. त्यामुळे ही लोकल धावण्यास अडचणी निर्माण होतानच त्यात तांत्रिक बिघाडही उद्भवू शकतात, अशी बाब समोर आली आहे. साधारण सहा महिन्यांपूर्वी एसी लोकल मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. मात्र या लोकलच्या चाचण्या काही सुरु झाल्या नव्हत्या. ३ नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या अंतर्गत चाचण्या घेण्यात येत आहेत. तत्पूर्वी ही लोकल अनेक कारणांनी चर्चेत राहिली. या लोकलची जास्त असलेली उंची त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकल धावण्यास अडचणी निर्माण झाल्या. ही अडचण पाहता एसी लोकल आपल्या मार्गावर धावू शकते का याची चाचपणी मध्य व पश्चिम रेल्वेकडून केली जात आहे. मात्र यात मध्य रेल्वेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते मुलुंड, डोेंबिवली ते ठाकुर्ली, विद्याविहार ते कुर्ला आणि कुर्ला ते सायन दरम्यान पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्याचा परिणाम रेल्वे रुळांवर होतो आणि ट्रॅक हे अधिकच कमकुवत होत जातात. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाकडून त्याची देखभाल-दुरुस्ती केली जाते. एसी लोकलसाठी हे रुळ योग्य नसून त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणींचा सामना रेल्वे प्रशासनाला करावा लागेल. एसी लोकलमध्ये अनेक सॉफ्टवेअर असल्याने ही लोकल प्रत्यक्षात रुळावर धावताना ‘व्हायब्रेट’होऊ शकते. त्यात रेल्वेने सांगितलेल्या चार ठिकाणाहून जाताना या लोकलला जास्त धक्के बसू शकतात आणि त्यामुळे एसी लोकलच्या तांत्रिक भागांना धक्का पोहोचू शकतो. यात बिघाडही होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेतील सूत्रांकडून सांगण्यात आले. सध्या एकच एसी लोकल असल्याने त्यात तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांना दुसरी लोकलही त्वरीत उपलब्ध केली जाऊ शकत नाही. (प्रतिनिधी)