लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सोबत फिरायला येत नाही म्हणून कार्यालयातील माजी महिला कर्मचाऱ्यासोबत भररस्त्यात अश्लील चाळे करत तिला मारहाण केल्याची घटना सोमवारी पायधुनीत घडली. या प्रकरणी पायधुनी पोलिसांनी राजेश कांबळे (४२) विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार २७ वर्षीय तरुणी चेंबूर परिसरात राहते. सप्टेंबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या दरम्यान ती पायधुनी येथील एका खासगी कंपनीत कामाला होती. त्याच ठिकाणी कांबळेही काम करत होता. सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तक्रारदार तरुणी पायधुनी येथून जात होती. त्याच दरम्यान कांबळेची नजर तिच्यावर पडली. त्याने तिला बाहेर फिरायला जाऊया, असे सांगितले. तिने त्यास नकार दिल्याच्या रागातून त्याने भररस्त्यात तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिला मारहाण केली. महिलेने तत्काळ पायधुनी पोलीस ठाणे गाठून याबाबत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पायधुनी पोलिसांनी कांबळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पायधुनी पोलिसांनी दिली.
फिरायला येत नाही म्हणून भररस्त्यात तरुणीला मारहाण
By admin | Updated: July 5, 2017 04:54 IST