Join us

‘मराठी टिकवण्यास मराठी शाळेला पर्याय नाही’, मालाड येथील उत्कर्ष मंदिर शाळेतील बैठकीतील सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 02:27 IST

गेल्या काही वर्षांत मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्याकडे पालकांचा कल असल्याचे दिसून येते. पण घरामध्ये मातृभाषा मुलांना शिकवणारच, अशी भूमिका पालकांची असते. पण ही भूमिका फसवी असून मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळांना पर्याय नसल्याचा सूर मराठी शाळा संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिसून आला.

मुंबई : गेल्या काही वर्षांत मुलांना इंग्रजी माध्यमात घालण्याकडे पालकांचा कल असल्याचे दिसून येते. पण घरामध्ये मातृभाषा मुलांना शिकवणारच, अशी भूमिका पालकांची असते. पण ही भूमिका फसवी असून मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळांना पर्याय नसल्याचा सूर मराठी शाळा संवर्धनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिसून आला.मालाड येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या उत्कर्ष मंदिर या शाळेत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकांनी हजेरी लावली होती. या बैठकीला संस्थेचे विश्वस्त अशोक परांजपे, शाळेचे कार्याध्यक्ष संजय तळेगावकरही उपस्थित होते.मराठी अभ्यास केंद्राच्या शाळा गटाच्या प्रमुख डॉ. वीणा सानेकर यांनी सांगितले की, जागतिकीकरणाच्या बाजारात आम्ही आमच्या भाषेलाही उभे केले. पण जास्त पगार देणाºया नोकºया हव्यात म्हणून मग मुलांना इंग्रजी माध्यमात घालून त्यांना रेसचे घोडे बनवले जाते. पण मराठी माध्यमात मुलाला आनंददायक शिकता तर येतेच, शिवाय व्यक्तिमत्त्व विकासासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळही असतो. हे त्यांनी स्वत:च्या मुलीचे उदाहरण देऊन सांगितले. केवळ मराठी भाषा दिन साजरा करून आणि गुढीपाडव्याला मिरवणुका काढून मराठी भाषा आणि संस्कृती टिकणार नाही. तर मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृती जिवंत राहील, असेही त्यांनी सांगितले.>मुलाच्या विकासात शिक्षकाप्रमाणे पालकही महत्त्वाचापालक संमेलनाचे समन्वयक आनंद भंडारे यांनी महाराष्ट्रात प्रथमच आयोजित करण्यात येणाºया या पालक संमेलनामागील मराठी अभ्यास केंद्राची भूमिका स्पष्ट केली. मुलाच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाइतकाच पालकही महत्त्वाचा असतो. मराठी माध्यमातील पालकवर्ग एकवटून आपल्या पाल्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे जागृत झालेले पालक मग आपल्या मुलाच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याबाबत आग्रही राहतील. या वेळी भंडारे यांनी संमेलनाचे स्वरूपही पालकांसमोर मांडले.