हितेन नाईक, पालघरराज्यातील गरीब शेतकऱ्यांना हक्काची वाटणारी अशी ठाणे जिल्हा कृषी भूविकास बँक १५ वर्षांपासून आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. वाटप केलेले कर्ज वसूल करणे एवढेच काम उरलेल्या बँकेतील कर्मचाऱ्यांना २८ महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी ओढवली असून नव्या सरकारने यासंदर्भात लक्ष घालून या बँकेला पुनरुज्जीवित करावे, अशी मागणी समस्त कर्मचारीवर्गाकडून केली जात आहे.भूविकास बँकेने कर्जवाटपाची प्रक्रिया बंद केल्याने त्याची सर्वात मोठी झळ स्थानिक गरीब शेतक ऱ्यांना बसली असून कर्जासाठी त्यांना अन्य बँकांचे आणि सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या बँकेने पुन्हा कर्जवाटप प्रक्रिया सुरू करावी, यासाठी बँकेचे भागधारक, शेतकरी, सहकारी संस्था, संघटना, आमदार, विरोधी पक्ष नेहमीच आवाज उठवीत आहेत. मात्र, शासनाच्या कानापर्यंत त्यांचे आवाज पोहोचलेले नाहीत. ज्या विरोधी पक्षांनी या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला, ते आता नवीन सरकारमध्ये आल्याने ते शेतकरी व बँकेसंदर्भात ठोस पावले उचलतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. राज्य सरकारने या बँकेच्या २९ जिल्हा शाखांवर प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधकाची नेमणूक केली आहे. परंतु, या सर्व बँकांची शिखर बँक असलेल्या मुंबई शिखर बँकेने आपले हात वर करून प्रत्येक बँक व शाखेने आपल्या कुवतीनुसार व्यवहार सुरू ठेवावेत, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या बँकांचे व्यवहार पूर्णत: ठप्प होऊन अडगळीत पडले आहेत. त्यामुळे नवीन सरकारने या बँकेचे पुनरुज्जीवन करावे, अशी मागणी होत आहे. ०
भूविकास बँकेत २८ महिने पगार नाही
By admin | Updated: November 7, 2014 23:36 IST