Join us

पाळीव प्राण्यांच्या उद्यानासाठी जागा नाही

By admin | Updated: June 15, 2017 03:23 IST

भटक्या श्वानांच्या त्रासामुळे त्यांना ठार मारण्याची मागणी बऱ्याचवेळा होत असते. तरीही मुंबईत अगणित श्वान प्रेमीदेखील आहेत. या श्वानप्रेमींना मात्र आपल्या पाळीव

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भटक्या श्वानांच्या त्रासामुळे त्यांना ठार मारण्याची मागणी बऱ्याचवेळा होत असते. तरीही मुंबईत अगणित श्वान प्रेमीदेखील आहेत. या श्वानप्रेमींना मात्र आपल्या पाळीव श्वानाला घेऊन उद्यानांमध्ये फिरण्यास मनाई आहे. मुंबईतील अनेक उद्याने आणि मैदानांचा विकास होत असताना एखादे उद्यान पाळीव प्राण्यांसाठीही असावे, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र पेट गार्डनची संकल्पना मुंबईत रुजण्यास आणखी काही काळ जाणार आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे लोकांना पुरेशी मैदाने आणि उद्याने उपलब्ध नसताना प्राण्यांसाठी उद्यान उभारणे शक्य नाही, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट करीत हा प्रस्ताव फेटाळला आहे.मुंबईत २७ हजार पाळीव श्वान आहेत. तसेच मांजर, पक्षी, ससे, कासव असे अनेक प्राणी घरी पाळण्यात येतात. या प्राण्यांची नोंद पालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये केली जाते. पाळीव प्राण्यांच्या वैद्यकीय शुश्रूषेसाठी मुंबईत विविध ठिकाणी उपचार केंद्रेही आहेत. मात्र पाळीव प्राण्यांमध्ये विशेषत: पाळीव श्वानांना फिरवताना रस्त्यावरील भटके श्वान त्यांच्या मागे लागतात. त्यामुळे पाळीव श्वानांचे रस्त्यावर फिरवणेही जिकिरीचे होते. पेट गार्डनची सुविधा उपलब्ध असल्यास नागरिकांना पाळीव पशुपक्ष्यांना अशा उद्यानात फिरण्यासाठी नेणे शक्य होईल, असे मत काँग्रेसचे माजी नगरेसवक परमिंदर भामरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे व्यक्त केले आहे.काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा साळुंखे यांनीही अशाच प्रकारे मागणी यापूर्वी केली होती. शहरातील मुख्यत: कुलाबा, मरिन ड्राइव्ह या भागात पाळीव प्राण्यांसाठी वेगळे असे एकही उद्यान नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मात्र यावर स्पष्ट मत देताना या मागणीला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. - मुंबईकरांच्या विरंगुळ्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात कमी मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. त्यामुळे पाळीव पशुपक्ष्यांना फिरण्यासाठी पेट गार्डनची सुविधा प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी सांगितले.