Join us  

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकीत दणदणाट नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 6:41 AM

गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत उच्च न्यायालयाने साउंड सिस्टीमसह डीजेवर घातलेली बंदी शुक्रवारी कायम ठेवली.

मुंबई : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत उच्च न्यायालयाने साउंड सिस्टीमसह डीजेवर घातलेली बंदी शुक्रवारी कायम ठेवली. त्यामुळे यंदा अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट होणार नाही. न्यायालयाने ही याचिका प्रलंबित ठेवली असून राज्य सरकारला याबाबत चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, साउंड सिस्टीमधारकांच्या ‘पाला’ संघटनेने या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.ध्वनिप्रदूषण प्रतिबंध नियमावली २००० नुसार मर्यादेतच राहील, इतपत आवाजाची निर्मिती करणाऱ्या साउंड सिस्टीमची निर्मिती करता येते, हे पटवून देण्यास प्रोफेशनल आॅडिओ आणि लायटिंग असोसिएशन (पाला) अपयशीठरले आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने ‘पाला’ला तात्पुरता दिलासा देण्यासही नकार दिला.उत्सवांदरम्यान डीजे किंवा साउंड सिस्टीम वापरण्यास राज्य सरकारने घातलेल्या बंदीला ‘पाला’ने उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावरील सुनावणीदरम्यान हा निकाल देण्यात आला. या याचिकेवरील सुनावणी न्या. शंतनू केमकर आणि न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे होती.>बाजू मांडण्यात संघटना अपयशीध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन न करता साउंड सिस्टीम वापरली जाऊ शकते, हे सिद्ध करण्यात संघटना अपयशी ठरली आहे. पर्यावरण प्रदूषित होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने ध्वनिप्रदूषण प्रतिबंध नियमावली २००० तयार केली. त्याचा आधार घेत साउंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घालून राज्य सरकारने योग्य पाऊल उचलले आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक आहे. डीजेला परवानगी दिली तर आवाजाच्या पातळीत थोडीफार वाढ होईल, हा युक्तिवाद आम्ही स्वीकारू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने डीजेवरील बंदी कायम ठेवताना म्हटले आहे.

टॅग्स :न्यायालय