Join us

एसी लोकलचा दिलासा नाहीच

By admin | Updated: February 20, 2017 04:13 IST

एसी लोकलचा दिलासा मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांना अजूनही मिळालेला नाही. या लोकलचा मुक्काम कारशेडमध्ये असून

मुंबई : एसी लोकलचा दिलासा मुंबई उपनगरीय लोकल प्रवाशांना अजूनही मिळालेला नाही. या लोकलचा मुक्काम कारशेडमध्ये असून चाचण्याही रखडल्या आहेत. भेल कंपनीकडून काही तांत्रिक बाबी पूर्ण करून आरडीएसओकडे (रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन)देण्यात आलेली नाही. त्यामुळेच चाचण्याही थांबल्याचे सांगितले जाते. रखडलेल्या चाचण्या आणि एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावण्यासाठी अद्यापही न मिळालेली परवानगी त्यामुळे उकाड्यातही एसी लोकलचा दिलासा मिळेल की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ही लोकल पश्चिम रेल्वेने चालवावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाकडे आणि पश्चिम रेल्वेकडे केली. त्यानुसार पश्चिम रेल्वेनेही रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला असून अद्याप त्याला मंजुरी मिळालेली नाही. दरम्यान, एसी लोकलच्या कारशेडबाहेर काही चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्याआधी भेल कंपनीकडून काम करण्यात आलेल्या या लोकलच्या काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे काम सुरू असून अद्यापही चाचणी करणाऱ्या आरडीएसओकडे लोकल देण्यात आलेली नाही. त्यामुळे कारशेडबाहेर होणाऱ्या चाचण्याही झालेल्या नाहीत. मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून लोकल प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी माहिती दिली जात असतानाच तशा हालचाली होताना मात्र दिसत नाहीत. त्यामुळे लोकल सेवेत नक्की येणार कधी, असा सवाल उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)