Join us

ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे फोटो नाहीत

By admin | Updated: April 2, 2015 02:39 IST

मतदानाच्या ईव्हीएम मशिनवर उमेदवाराच्या पक्षचिन्हासोबत त्याचे छायाचित्र असावे, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती.

नवी मुंबई : मतदानाच्या ईव्हीएम मशिनवर उमेदवाराच्या पक्षचिन्हासोबत त्याचे छायाचित्र असावे, अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. परंतु उमेदवारांचे छायाचित्र मशिनवर टाकले जाणार नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. निवडणुकीसाठी प्रत्येकाला ४ लाख रुपयांचीच मर्यादा असून त्यामध्ये वाढ होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी महापालिकेमध्ये येऊन निवडणुकीविषयी कामांचा आढावा घेतला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठकही आयोजित केली होती. बैठकीत निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे व इतर माहिती देण्यात आली. उमेदवारांच्या सुविधेसाठी २ व ३ एप्रिलला सुट्टी असूनही अर्ज विक्री व स्वीकारण्याचे काम सुरू ठेवण्यात येणार आहे. अर्ज दाखल करताना आवश्यक शपथपत्रे स्टॅम्प पेपरवर असणे बंधनकारक नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उमेदवारांना ४ लाखांपर्यंत खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. या मर्यादेमध्ये वाढ होणार नाही. ईव्हीएम मशिनवर उमेदवाराच्या नावासोबत त्यांचे छायाचित्र असावे, अशा सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु अशाप्रकारे छायाचित्र देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र, दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र, गुन्हेगारीविषयी माहिती देणारे शपथपत्र द्यावे लागणार आहे. अर्ज भरणारे उमेदवार मालमत्ताकर, एलबीटी, पाणीबिल थकीत नसल्याचा ना हरकत दाखला मिळविण्यासाठी धडपडत आहेत. याविषयी माहिती देताना उपआयुक्त अमरीश पटनिगिरे यांनी सांगितले की छाननीच्या वेळी कोणी पुरावे म्हणून कागदपत्रे सोबत ठेवावीत. उमेदवारांना होर्डिंग व इतर परवानग्या मिळविताना अडचण येऊ नये यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. (प्रतिनिधी)