Join us  

तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक नाही; मात्र रविवारी, सोमवारी धावतील कमी लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 3:54 AM

मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही.

मुंबई : मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आलेला नाही. मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळेल. मात्र, मध्य, हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल रविवार २७ व सोमवार २८ ऑक्टोबर रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील. परिणामी, कमी लोकल धावणार असल्याने सणासुदीच्या दिवशी प्रवाशांना गर्दीला सामोरे जावे लागेल. दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल.

लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्दशी रविवारी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे, तर सोमवारी दीपावली पाडवा आणि बलिप्रतिपदा आहे. या दोन्ही दिवशी लोकल सुट्टीकालीन वेळापत्रकानुसार धावतील.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. मात्र, शनिवार-रविवारच्या मध्यरात्री अंधेरी ते बोरीवली स्थानकादरम्यान रात्रकालीन ब्लॉक असेल. रात्री १२ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर चालविण्यात येतील.

काही तिकीट खिडक्या असतील बंद

दिवाळीच्या सुट्टीमुळे मध्य रेल्वे मार्गावरील संगणकीय आरक्षण केंद्र बंद असतील. त्यानुसार, २८ आॅक्टोबर रोजी दुपारी २ ते रात्री १० पर्यंत काही तिकीट खिडक्या बंद असतील. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून काही तिकीट खिडक्या खुल्या ठेवण्यात येतील.

टॅग्स :पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेहार्बर रेल्वेदिवाळी