Join us
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 01:36 IST

४०-५० टक्के पदे रिक्त; निवृत्तीचे वय वाढवले, तात्पुरती भरती

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड काळात पालिका रुग्णालयावरील ताण वाढल्यामुळे कंत्राटी डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. तर, तज्ज्ञ अनुभवी डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ५९ वर्षे करण्यात आले. परंतु, ही भरती तात्पुरत्या स्वरूपात असून वैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल ४० ते ५० टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे. 

कोरोना काळात महापालिकेने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढविल्यानंतर याबाबतचा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे शुक्रवारी मांडण्यात आला. महापालिकेच्या केईएम, नायर, सायन आदी प्रमुख रुग्णालयांत आणि १६ सर्वसाधारण रुग्णालयांत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त असल्याची कबुली या प्रस्तावातून प्रशासनाने दिली आहे. याचे तीव्र पडसाद स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. पालिका रुग्णालयात डॉक्टरांच्या ५० टक्के जागा रिक्त असतील तर या जागा का भरत नाहीत? एक वर्ष वय वाढविण्याचे अधिकार स्थायी समितीला असताना आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात याबाबतचा निर्णय कसा घेतला? जर निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना एक वर्ष वाढवून दिले तर तरुण डॉक्टर वंचित राहतील, असे सवाल भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केले. तर, निवृत्त डॉक्टरांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मानद तत्त्वावर काम करता येऊ शकते, असे सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी सुचविले. 

रिक्त पदे न भरता निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना परस्पर एक वर्ष वाढवून देण्याचा निर्णय चुकीचा आहे. पालिकेने रुग्णालयातील रिक्त पदे, रुग्ण, वैद्यकीय उपचार, सेवासुविधा याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली. प्रशासनाने निवृत्त होणाऱ्या डॉक्टरांचे वय परस्पर एक वर्ष वाढवून चुकीचा निर्णय घेतला असून हे सहन करणार नाही, असे बजावत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रस्ताव राखून ठेवला.

भूलतज्ज्ञ, फिजियोथेरपिस्टची कमतरताभूलतज्ज्ञाची पदे रिक्त असल्याने खाजगी रुग्णालयातून भूलतज्ज्ञांना बोलवावे लागते. अनेकवेळा भूलतज्ज्ञांची वेळ मिळत नसल्याने शस्त्रक्रिया लांबणीवर पडतात. यामुळे गरजू रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते, ज्यामुळे त्यांचे हाल होतात, असे शिवसेनेच्या राजुल पटेल यांनी निदर्शनास आणले. फिजियोथेरपिस्टही नसल्याने अनेक रुग्णांना खाजगी रुग्णालयात जावे लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 

जाचक अटी, निम्म्या पगारामुळे मिळत नाहीत डॉक्टर पालिका रुग्णालयातील जाचक अटी व शर्ती असल्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर काम करण्यास तयार होत नाहीत. खाजगी रुग्णालयांपेक्षा निम्मा पगार, मानधन मिळत असल्याने डॉक्टर येथे काम करीत नाहीत, असे सदस्यांनी निदर्शनास आणले. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिका