वसई : पालघर जिल्ह्यासाठी स्थापन करण्यात आलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नागरीकांना गैरसोयीचे ठरले आहे. येथे कामे वेगाने होत नसल्याने नागरीकांना तासन्तास तिष्ठत बसावे लागते. याबाबत परिवहन मंत्र्यांनी लक्ष घालून नागरीकांना दिलासा मिळवून द्यावा अशी मागणी होत आहे.विरार पूर्वेकडे चंदनसार भाटपाडा येथे ३ वर्षांपूर्वी वसई, पालघर, डहाणू व तलासरी या ४ तालुक्यांसाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आले. हे कार्यालय सोयीचे असले तरी येथील कामकाजाविषयी नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दररोज शेकडो अर्ज येत असतात परंतु त्याबाबत कसलाच निर्णय, लवकर होत नाही. या कार्यालयामध्ये दूरध्वनी, इंटरनेट या सेवा उपलब्ध नाहीत. टेलीफोनचे बिल थकल्यामुळे तो सध्या बंद आहे. परवाने तसेच आरसी बुकचे वाटप पोस्ट खात्यातून होत नाही. येथील पोस्ट कार्यालयामध्ये परिवहन खात्याची शेकडो कागदपत्रे पडून असतात. या परिस्थितीतच राज्यशासनाने दलालमुक्त परिवहन कार्यालय ही योजना राबवली. पूर्वी किमान दलालांमार्फत तरी नागरीकांची कामे जलदगतीने होत असत. परंतु आता मात्र कर्मचारीवर्ग कमी असूनही सर्वच कामांसाठी त्यांच्यावर विसंबून रहावे लागत आहे. यासंदर्भात विरारचे नगरसेवक विलास चोरघे यांनी थेट परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना साकडे घातले आहे. (प्रतिनिधी)
आरटीओत दूरध्वनी, इंटरनेट नाही
By admin | Updated: March 9, 2015 22:59 IST