Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेशनवर चणे आलेच नाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:09 IST

मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विशेषत: ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशांना अडचणी सामोरे जावे लागले. या काळात ...

मुंबई : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विशेषत: ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशांना अडचणी सामोरे जावे लागले. या काळात संबंधितांना दिलासा म्हणून आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मे - जून २०२० या काळात केंद्राने रेशन दुकानांवर चण्यांचा साठा पाठवूनदेखील दिला; मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकानांवर दाखल झालेले चणे रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मिळालेच नाहीत. मग ते चणे कुठे गेले? असा सवाल केला जात असून, रेशन दुकानांकडे अशाच नागरिकांची माहितीच उपलब्ध असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सागर उगले यांनी केंद्राकडे याबाबत माहिती मागितली होती. त्यानुसार, केंद्राने त्यांना दिलेल्या कागदपत्रातील माहितीप्रमाणे कोरोनाच्या महामारीत आर्थिकदृष्ट्या गरिबांना दिलासा देण्यासाठी चणे विनामूल्य वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेषत: मे ते जून २०२० या काळात स्थलांतरित कामगारांसाठी, ज्यांच्याकडे काहीच आधार नाही, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशांसाठी ही मदत होती. दोन महिन्यांकरिता प्रति महिना एक किलो चणा या पद्धतीने वितरित करण्यात येणार होते. या संपूर्ण योजनेसाठीची तरतूद २८० कोटी रुपये एवढी होती.

मुंबईतल्या रेशन दुकानांवर असेच रेशन मिळण्याची मारामार असताना चणे कसे मिळणार? असा सवाल सागर उगले यांनी केला. केंद्राच्या योजनेनंतर पश्चिम उपनगरातल्या बहुतांशी दुकानांमध्ये वितरित करण्यात येणाऱ्या चण्यांबाबत त्यांनी विचारणा केली; मात्र याबाबत त्यांना कुठेच स्पष्ट माहिती मिळाली नाही. विशेषत: ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, अशा लोकांसाठी हे चणे होते. स्थलांतरित कामगारांसाठी हे चणे होते; मात्र स्थलांतरित कामगारांचा किंवा अशा नागरिकांची माहिती रेशन दुकानांकडे नसल्याने आलेले चणे नेमके गेले कुठे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील लाभार्थ्यांचा आकडा ३ लाख ८१ हजार ८५ असा असला तरी मग प्रत्यक्षात हे चणे वितरित झाले नसल्याचे म्हटले जात आहे.