Join us

रोह्यात चार महिन्यांपासून रेशनिंगवर धान्यवाटप नाही

By admin | Updated: May 27, 2014 02:24 IST

रोहा तालुक्यात फेबु्रवारी महिन्यापासून केशरी कार्डधारकांना धान्यवाटप करण्यात आलेले नाही

रोहा : रोहा तालुक्यात फेबु्रवारी महिन्यापासून केशरी कार्डधारकांना धान्यवाटप करण्यात आलेले नाही. रेशनिंगवर धान्य नसल्याने येथील नागरिकांना खुल्या बाजारातून चढ्या भावाने धान्य खरेदी करावे लागत आहे. याबाबत रोह्याचे उपविभागीय अधिकारी सुभाष भागडे व तहसीलदार उर्मिला पाटील यांची पत्रकारांनी भेट घेतली. फेबु्रवारी महिन्यापासून केशरी कार्डधारकांना वितरीत करण्यासाठी धान्य आलेले नाही, असे सांगण्यात आले. याबाबत प्रेसनोट प्रसिद्ध करु असे सांगून आठवडा झाला तरी प्रांत व तहसील कार्यालयाचा खुलासा आलेला नाही. यामुळे धान्य आले की आलेच नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. रोहा तालुक्यात सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था कोलमडलेली आहे. रेशनिंग दुकानदार दर महिन्याच्या शेवटच्या १० दिवसांत धान्य वितरणासाठी आणतात. ३ ते ४ दिवसांत सर्व धान्य संपल्याने दुकान बंद केले जाते. महिनाअखेरीस धान्य वितरण केले जात असल्याने सर्वसामान्य जनतेला पैशाअभावी धान्य खरेदी करता येत नाही. रोहा तालुक्यातील रेशनिंग दुकानांचा विचार केला असता सरासरी ७० क्विंटल तांदूळ तर ३० क्विंटल गहू असे धान्य वितरीत करण्यात येते. १०० क्विंटल धान्य म्हणजे १०,००० किलो धान्य ३-४ दिवसांत कसे काय एक माणूस वितरीत करतो हे एक आश्चर्यच आहे. कारण रेशनिंग दुकानात असणारी एक व्यक्ती रोज ५ ते ६ तास याप्रमाणे काम करते. एकंदरच या अन्नसुरक्षा योजनेचा बोजवारा उडाला असल्याच्याच संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (वार्ताहर)