Join us

कब्रस्तानात नरबळी नाही, दोघांची हत्या !

By admin | Updated: October 6, 2015 02:38 IST

कोकणी कब्रस्तानात रविवारी दोघांची हत्या झाली असून, ते नरबळी नसल्याचा शोध भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव एस. शिंदे यांनी लावला आहे.

भिवंडी : कोकणी कब्रस्तानात रविवारी दोघांची हत्या झाली असून, ते नरबळी नसल्याचा शोध भोईवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माधव एस. शिंदे यांनी लावला आहे. तर दुसरीकडे स्टेशन डायरीत अमानुष नरबळी, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील इदगाह रोडवरील कोकणी कब्रस्तानात रविवारी सकाळी जादूटोण्याच्या सामानासह दोन व्यक्तींची हत्या झाली असून, तो नरबळी नसल्याचा शोध तपास अधिकारी व.पो.नि. माधव शिंदे यांनी लावला आहे. मात्र गुन्हा नोंदविताना जादूटोणा क्रिया, अघोरी विद्या करण्यासाठी या दोन व्यक्तींना घटनास्थळी आणले. त्यांच्यावर धारदार तसेच बोथट हत्याराने वार करून डोक्यात दगडाने मारून जीवे मारल्याचे नमूद केले आहे. हा गुन्हा नोंदविताना परिमंडळ-२ चे प्रभारी पोलीस उपायुक्त पराग मणेरे पोलीस ठाण्यात उपस्थित होते. मृतांच्या पोटावर चाकू खुपसल्याच्या व शरीरावर झटापटीच्या खुणा आहेत. तर, मानेवर कापले नसल्याने ते नरबळी होऊ शकत नाहीत, अशी माहिती व.पो.नि. श्ािंदे यांनी दिली. घटनास्थळी ओळख पटलेल्या मिनरूल शेख याचा मृतदेह घेण्यासाठी त्याची पत्नी काल भिवंडीस आली असता तिने दुसऱ्या मृत व्यक्तीचे नाव लक्ष्मण असून, तो पतीबरोबर घरी येत असल्याचे सांगितले. त्याचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नसल्याचेही ती म्हणाली. या घटनेबाबत पोलिसांना तपासाची दिशा सापडत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी या वेळी कबूल केले. (प्रतिनिधी)