Join us
Daily Top 2Weekly Top 5

विषारी दारूकांडासाठी स्वतंत्र कायदा हवा

By admin | Updated: June 21, 2015 01:41 IST

मालवणी विषारी दारूकांडाने पोलिसांपासून सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मात्र विषारी दारूकांडाने शेकडोजणांचा बळी जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.

मुंबई: मालवणी विषारी दारूकांडाने पोलिसांपासून सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. मात्र विषारी दारूकांडाने शेकडोजणांचा बळी जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या २५ वर्षांतील हे तिसरे प्रकरण आहे. याआधील दोन दारूकांडातील आरोपींना सदोष मनुष्य वधाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यातील एक आरोपी तर जन्मठेपेची शिक्षा भोगून सुटलाही. त्यामुळे अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र व कठोर कायदा असायला हवा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.अशा कांडातील आरोपींवर आयपीसी कलम ३०४ (सदोष मनुष वध) यासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला होता. ३१ डिसेंबर १९९१ रोजी झालेल्या विषारी दारूकांडात आरोपींवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. या घटेनत ९० पेक्षा अधिकजणांचा बळी गेला होता. पण त्या आरोपींचा हेतू हत्येचा असल्याचे स्पष्ट न झाल्याने त्यातील आरोपींना सदोष मनुष्य वधासाठी जन्मठेपेची शिक्षा झाली. यातील आरोपी चंद्रकांत बाबूराव पवार हा १२ वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा भोगून सुटलाही. तर २००२ मध्ये विक्रोळी येथे झालेल्या विषारी दारूकांडातील आरोपींना सदोष मनुष्य वधासाठीच सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या कांडात ८७ जण मृत्यूमुखी पडले होते.महत्त्वाचे अशा प्रकरणात जन्मठेप झालेल्या आरोपींच्या शिक्षेची वर्षे पंधरा ते अठरा वर्षांपर्यंत मोजली जाऊ शकते. त्यातही अशा कैद्यांना माफीचीही तरतुद आहे. त्यामुळे हे आरोपी दहा ते पंधरा वर्षे शिक्षा भोगून सुटतात. असाच फायदा चंद्रकांत पवार याला मिळाला व तो बारा वर्षांची जन्मठेप भोगून सुटला.या दोन घटनांनतरही राज्य शासनाने विषारी दारूकांडाला प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही स्वतंत्र तरतुद अथवा कायदा केला नाही. सध्या अस्तित्त्वात असलेल्या कायद्यान्वयेच यातील आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला जातो. यातील शिक्षेची तरतुद तुटपुंजी असल्याने असे कांड करायला कोणी घाबरत नाही. कारण मालवणी विषारी दारूंकाडात बळी पडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने हे प्रकरण पुढे आले आहे. प्रत्यक्षात अशी प्रकरणे घडतच असतात. मात्र बहुतांशवेळा ती सर्वसामान्यांपर्यंत अथवा शासनापर्यंतही पोहोचत नाही. त्यामुळे शासनाने यासाठी ठोस व कठोर कायदा करायला हवा, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.मालवणीसारखी प्रकरणे यापूर्वी घडली आहेत, मात्र हा कायदा तयार करण्यासाठी प्रशासनाने कृतीशील पाऊले उचलली पाहिजेत. तसेच शासनाने दारुबंदीसाठी विविध जनजागृतीपर उपक्रम हाती घेऊन तळागाळातील समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जेणेकरुन दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्या घडू नये, यासाठीची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.- अभय बंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विषारी दारुप्रकरणी दोषी असणाऱ्यांविरोधात मोक्का लागू केला पाहिजे. अवैध दारुच्या विक्रीत पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचाही सहभाग असल्याने त्यांच्यावरही कठोर कारवाई झाली पाहिजे. कायद्याची अमंलबजावणी केली पाहिजे.- वर्षा विद्या विलास, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ, विषारी दारूकांड रोखण्यासाठी सध्या अस्तित्त्वात असलेला कायदा पुरेसा नाही. कारण यात कठोर शिक्षेची तरतुद नाही. शासनाने यासाठी स्वतंत्र तरतुद करून जन्मठेपेच्या शिक्षेचा कालावधी वाढवायला हवा. अथवा त्याहीपेक्षा कठोर शिक्षेची तरतुद करायला हवी.- अ‍ॅड. उदय प्रकाश वारूंजीकर