मुंबई : बंदुकीचे लायसन मिळाले म्हणून कोणावरही गोळी चालविण्याचा अधिकार मिळत नसतो. त्याचप्रमाणे अॅट्रॉसिटी कायदा आहे म्हणून त्याचा गैरवापर करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे मत भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी आज येथे व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अॅट्रॉसिटी कायद्याचा अनेकवेळा गैरवापर होत असल्याची उदाहरणे आहेत. देशात गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या अॅट्रॉसिटीच्या खटल्यांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ सहा टक्के आहे. याचा दुसरा अर्थ निरपराध असलेल्या अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते हे स्पष्ट होते. आज अॅट्रॉसिटी कायद्यात बदलाची भूमिका मांडणारे महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणविणारे नेते संसदेत या कायद्यात दुरुस्तीचे विधेयक आले तेव्हा काहीच का बोलले नाहीत, असा सवाल पटोेले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला. त्या वेळी आपण एकट्यानेच ‘या कायद्याचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची तरतूद कायद्यात करावी, अशी मागणी केली होती, असे पटोेले म्हणाले. मराठा समाजाच्या मोर्चांना त्यांनी पाठिंबा दर्शविला. (विशेष प्रतिनिधी)ओबीसींना आरक्षणाचा फायदा काय मिळाला?ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. या समाजाला शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीत आरक्षणच नाही. ओबीसींच्या कल्याणाचा विषय सामाजिक न्याय विभागांतर्गत येतो आणि हा विभाग केवळ अनुसूचित जातींच्या प्रश्नांकडेच पाहतो. म्हणून ओबीसींसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी पटोेले यांनी केली.
बंदूक आहे म्हणून गोळी चालविणार का?
By admin | Updated: September 27, 2016 02:13 IST