Join us

सोमय्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम कायम!, ‘ती’ टीका विसरलो नसल्याची शिवसैनिकांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 01:26 IST

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मुंबईतील अन्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपा नेतृत्वाने किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला अद्याप हिरवा कंदील दाखविला नाही.

मुंबई : उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवाराबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. मुंबईतील अन्य मतदारसंघातील उमेदवार जाहीर करणाऱ्या भाजपा नेतृत्वाने किरीट सोमय्यांच्या उमेदवारीला अद्याप हिरवा कंदील दाखविला नाही. त्यातच, प्रविण छेडा यांची भाजपात घरवापसी झाल्यामुळे उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे. शिवाय, शिवसैनिक ‘ती’ टीका विसरले नसल्याचे सांगत शिवसेनेने सोमय्यांच्या नावाला आपला विरोध कायम ठेवला आहे.किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर अनेकदा अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. शिवसैनिक सोमय्या यांनी केलेली टीका विसरलेले नाहीत. त्यामुळे उत्तर पूर्व मतदार संघात किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याचे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते या मतदार संघातील उमेदवारीबाबत निर्णय घेतील, असेही शेवाळे यांनी सांगितले.दरम्यान, एकाच जागेवर वेगवेगळ्या प्रबळ दावेदारी असलेल्या मतदारसंघातील तिढाही भाजपाने सोडविला. विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या पुणे, माढा, सोलापूर, भंडारा-गोंदिया मतदारसंघातीलही उमेदवार निश्चित झाले. मुंबईतून शेट्टी आणि महाजन यांची उमेदवारी एका फटक्यात जाहीर करण्यात आली. त्या तुलनेत गुजराती, मारवाडी मतदारांची मोठी संख्या असलेल्या उत्तर पूर्वमधील भाजपाचा उमेदवार अद्याप ठरला नाही. त्यामुळे सोमय्या यांचा पत्ता कापला जाण्याची चर्चा स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे.

टॅग्स :किरीट सोमय्यालोकसभा निवडणूक