अलिबाग : अलिबाग-मुरुड विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी तीन उमेदवारांनी सहा अर्ज दाखल केले. गुरुवारपर्यंत दोनच उमेदवारांनी चार अर्ज दाखल केले असल्याची माहिती प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांनी दिली.शुक्रवारी शेकापचे अधिकृत उमेदवार सुभाष तथा पंडित पाटील, शेकापचेच आस्वाद पाटील, आणि बसपाचे अनिल गायकवाड यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले.शनिवारी काँग्रेसचे मधुकर ठाकूर, शिवसेनेचे अधिकृत उमेदवार महेंद्र दळवी यांच्यासह काही अपक्ष उमेदवार आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असून रात्री उशिरापर्यंच नावे पक्की होतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने त्यानंतरच खरी परिस्थिती कळेल. (विशेष प्रतिनिधी)
मुरुडमध्ये सहा उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Updated: September 26, 2014 23:47 IST