Join us  

नाईक महामंडळाचे तत्कालीन एमडी निलंबित, कर्जवाटपातील घोटाळे भोवले

By यदू जोशी | Published: February 17, 2018 2:07 AM

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि सध्या नाशिक विभागात प्रादेशिक व्यवस्थापक असलेले रमेश विठ्ठल बनसोड यांनाशुक्रवारी निलंबित करण्यात आले. ‘लोकमत’ने या घोटाळ्यांवर प्रकाश टाकला होता.

मुंबई : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांप्रकरणी महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक आणि सध्या नाशिक विभागात प्रादेशिक व्यवस्थापक असलेले रमेश विठ्ठल बनसोड यांनाशुक्रवारी निलंबित करण्यात आले. ‘लोकमत’ने या घोटाळ्यांवर प्रकाश टाकला होता.निलंबनाच्या काळात बनसोड यांनी महामंडळाचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक परमेश्वर जकिकोरे यांच्या परवानगीशिवाय नाशिक हे सध्याचे त्यांचे मुख्यालय सोडू नये, तसेच त्यांनी कार्यालयातील कोणतीही कागदपत्रे हाताळू नयेत, असे बजावण्यात आले आहे.बनसोड हे ३० मे २०१४ ते १६ जुलै २०१६ आणि २५ एप्रिल २०१७ ते २२ जून २०१७ या दरम्यान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक होते. त्या काळात झालेल्या घोटाळ्यांबद्दल त्यांना आज निलंबित करण्याचा आदेश विमुक्त जाती, भटक्या जमाती व ओबीसी कल्याण विभागाने काढला.महामंडळामध्ये लातूर जिल्ह्यातील कर्जवाटपात जवळपास साडेतीन कोटी रुपयांचे घोटाळे झाले. एकाच कुटुंबातील १६ जणांना कर्जे देण्यात आली. एकच व्यक्ती कर्जासाठी ११ जणांना जामीन असल्याचा प्रकारही घडला. त्या ठिकाणी कर्जाच्या रकमेचे चेक हे काही लाभधारकांच्या खात्यात जमा न होता प्रकाश गारमेंट्स, प्रकाश कॅप आणि अशोक विद्युत यांच्या खात्यात जमा करण्यात आले. कर्जवाटपाबाबतचे पुरावे नष्ट करण्यात आले. या प्रकरणी गुन्हेही दाखल झाले आहेत.अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपकाबनसोड आणि इतर काही जणांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्यांप्रकरणी विद्यमान व्यवस्थापकीय संचालक जकिकोरे यांनी यापूर्वीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे ३०० पानी तक्रार दाखल केली आहे.- या शिवाय, नाशिक,धुळे, जळगाव, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांतही कर्जवाटपात घोटाळे झाले. व्यवस्थापकीय संचालक म्हणून असलेल्या अधिकारांचा बनसोड यांनी गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

टॅग्स :मुंबई