मुंबई : विकासासाठी खुले न झाल्यास आरे कॉलनीची दुसरी धारावी होईल, या आयुक्त सीताराम कुंटे यांच्या विधानाचे तीव्र पडसाद पालिकेच्या महासभेत आज उमटले़ बेकायदा बांधकामांवर कारवाईची जबाबदारी पालिकेची आहे़ हे काम झेपत नसल्यास आयुक्तांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली़विकास आराखड्यावर आयोजित चर्चासत्रामध्ये आयुक्तांनी गुरुवारी हे वादग्रस्त विधान केले होते़ आरे कॉलनीच्या विकासाचे समर्थन करताना, या हरित पट्ट्यांवर दुसरे गणपत पाटील नगर किंवा धारावी उभी राहील, असे परखड मत आयुक्तांनी मांडले होते़ मात्र यावर आक्षेप घेत मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी आरे कॉलनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा हा घाट असल्याचा आरोप केला़शिवसेनेनेही आयुक्तांच्या या वक्तव्याचा निषेध करीत सभा तहकुबी मांडली़ या प्रकरणी आयुक्तांकडून स्पष्टीकरण येईपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
...तर आयुक्तांनी राजीनामा द्यावा
By admin | Updated: March 14, 2015 01:46 IST