Join us
Daily Top 2Weekly Top 5

चोरीची वीजजोडणी मायलेकाच्या जिवावर

By admin | Updated: June 5, 2015 01:36 IST

ट्रॉम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरात राहणारे रोझी परवीन शेख आणि मोहम्मद फैजान शेख या मायलेकांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

मुंबई : ट्रॉम्बेच्या चित्ता कॅम्प परिसरात राहणारे रोझी परवीन शेख आणि मोहम्मद फैजान शेख या मायलेकांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. घरात चोरीची वीजजोडणी त्यांच्या जिवावर बेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी अवैधरीत्या वीजजोडणी करून देणाऱ्या वीजमाफिया राजाबाबूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.ट्रॉम्बे परिसरात राहणारा आरोपी राजाबाबू हा खाजगी वायरमन म्हणून काम करतो. याचबरोबर परिसरात राहणाऱ्या गरजू नागरिकांना गाठून तो अवैधरीत्या वीजजोडणी करून देत होता. काही दिवसांपूर्वी राजाबाबूने शेख कुटुंबीयांना चोरीची वीजजोडणी करून दिली होती. हीच चोरीची वीज शेख कुटुंबीयांच्या जिवावर बेतली. मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घरातील ओलसर लोखंडी जिन्यातून वीज प्रवाहित झाल्याने त्याचा धक्का बसून शेख मायलेकांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी राजाबाबूविरोधात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दुसऱ्या दिवसापासून राजाबाबू पसार झाल्याने त्याचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती ट्रॉम्बे पोलिसांनी दिली.