Join us  

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात जेव्हा ‘चौथी घंटा’ घणघणते..!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2019 12:45 AM

एका नाट्यप्रयोगाच्या आधी चक्क चौथी घंटा दिली गेली आणि नाट्यरसिकांसह सर्वच अवाक् झाले.

- राज चिंचणकर मुंबई : कोणत्याही नाटकाचा प्रयोग तिसऱ्या घंटेनंतर सुरू होतो, ही नाट्यसृष्टीतली प्रथा आहे. मात्र एका नाट्यप्रयोगाच्या आधी चक्क चौथी घंटा दिली गेली आणि नाट्यरसिकांसह सर्वच अवाक् झाले. अर्थात, याला कारणही तसेच ठोस होते. नाट्यसृष्टीच्या इतिहासात चौथ्या घंटेचा हा प्रयोग बहुधा प्रथमच घडला असावा. बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये नाटकाच्या प्रयोगापूर्वी ही चौथी घंटा घणघणली.रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांच्या व्हिजन या नाट्यसंस्थेतर्फे १ ऑगस्ट रोजी ‘आतंक’ आणि ‘ऍनेस्थेशिया’ असे दोन नाट्यप्रयोग या नाट्यगृहात सादर करण्यात आले. तिसºया घंटेनंतर प्रयोग सुरू होणार म्हणून रसिक सरसावून बसले होते. मात्र तिसºया घंटेनंतर या प्रयोगातले ज्येष्ठ कलावंत सुगत उथळे हे थेट रसिकांसमोर आले आणि त्यांनी मोबाइल सायलेंट मोडवर ठेवण्याचे आवाहनरसिकांना केले. त्यानंतर चौथी घंटा देण्यात आली; आणि प्रयोग सुरू झाला.नाट्यगृहात नाटकांचे प्रयोग सुरू असताना मोबाइल वाजण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे आणि या मुद्द्यावर सध्या नाट्यसृष्टीत चर्चा झडत आहे. मोबाइल बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवण्याचे आवाहन करूनही, रसिक ही गोष्ट गांभीर्याने घेत नसल्याचेही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर, व्हिजन या नाट्यसंस्थेने चौथ्या घंटेची शक्कल लढवली. विशेष म्हणजे, या अनोख्या प्रकारानंतर नाट्यप्रयोग सुरू असताना एकदाही कुणाचा मोबाइल वाजला नाही. साहजिकच, चौथ्या घंटेचा हा प्रयोग सुफळ संपूर्ण झाल्याचे स्पष्ट झाले.यापुढेही हाच प्रयोगआमचा हा प्रयोग यशस्वी झाला असून, यापुढेही आमच्या व्हिजन संस्थेच्या नाटकाचा प्रत्येक प्रयोग चौथ्या घंटेनंतर सुरू केला जाईल. तिसऱ्या घंटेनंतर मोबाइल बंद करण्याची सूचना करून, त्यानंतर चौथी घंटा आम्ही देणार आहोत.- श्रीनिवास नार्वेकर (दिग्दर्शक, अभिनेता)