Join us  

मुंबईत ३४७ वर्षांपूर्वी बांधलेल्या ‘या’ किल्ल्याचा जिर्णोद्धार होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 2:14 PM

ऐतिहासिक ठेवा व सांस्कृतिक वैभव असणा-या आणि ३४७ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ऐतिहासिक ठेवा व सांस्कृतिक वैभव असणा-या आणि ३४७ वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महापालिकेच्या जी दक्षिण विभागाद्वारे पहिल्या टप्प्यातील जिर्णोद्धार कामांचे भूमिपूजन शुक्रवारी झाले असून, वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार व सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येईल.

शासनाच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारितील किल्ल्यांपैकी असलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये वरळी किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. उपलब्ध माहितीनुसार सदर किल्ला इसवी सन १६७५ मध्ये बांधण्यात आला. वरळी किल्ल्याची तटबंदी आणि किल्ल्यावरील पोर्तुगीजकालीन बांधकाम वैशिष्ट्ये आजही दिमाखात उभे आहेत. याच वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे व सभोवतालच्या परिसराच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

पहिल्या टप्प्यामध्ये वरळी किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचे काम लवकरच सुरु करण्यात येत आहे. या कामाकरिता महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, नागरी नियोजन सल्लागार जी एस ए तसेच पुरातन वास्तू जतन सल्लागार विकास दिलावरी यांचे सहकार्य लाभले आहे. वरळी किल्ल्याचा जिर्णोद्धार, सभोवतालच्या परिसराचे सुशोभिकरण आणि परिसरामध्ये आकर्षक प्रकाशझोत प्रणाली बसविणे यासाठी पुरातत्व व वास्तु संचालनालयाच्या संचालक यांचे ना हरकत पत्र यापूर्वीच प्राप्त झाले आहे.

१) जिर्णोद्धारांतर्गत प्रामुख्याने स्थापत्य स्वरुपाची कामे करण्यात येणार असून तटबंदीची डागाडुजी करण्यात येणार आहे. 

२) किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस व दक्षिणेकडील बाजूस समुद्र किनारी असलेल्या मोकळ्या जागेत सुरु, समुद्रफुल इत्यादी झाडांची आकर्षक लागवड करण्यात येणार आहे.

३) किल्ल्याबाहेरील मोकळ्या जागेत हिरवळ व इतर शोभेची झाडे लावून बेसॉल्ट दगडाच्या पायवाटा तयार करण्यात येणार आहेत. 

४) किल्ल्याची महती आणि माहिती सांगणारे फलक, दिशादर्शक फलक इत्यादी परिसरात जागोजागी बसविण्यात येणार आहेत.

५) वरळी किल्ल्यालगत विद्युतीकरण व प्रकाशझोत योजना तात्पुरती कार्यान्वित करण्यात आलेली असून, ही प्रकाशझोत व्यवस्था कायमस्वरुपी कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे.

टॅग्स :मुंबई