Join us
Daily Top 2Weekly Top 5

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मराठी माणसाच्या रक्ताचे ठसे उद्धव ठाकरेंच्या हातालाही लागलेय; आशिष शेलारांची खरमरीत टीका

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 7, 2024 22:32 IST

आपला लढा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंबरोबरच आहे. ही अभद्र युती महाविकास आघाडी आहे.

मुंबई- संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी माणसाच्या छातीवर काँग्रेसच्या सरकारने गोळ्या घातल्या. त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने हातमिळवणी केली. मराठी माणसाच्या खुणाच्या रक्ताने रंगलेला काँग्रेसचा हात उद्धव ठाकरेंनी हातात मिळवला आहे याचा अर्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मराठी माणसाच्या रक्ताचे ठसे उद्धव ठाकरेंच्या हातालाही लागलेय अशी खरमरीत टीका भाजपा मुंबई अध्यक्ष,आमदार अँड. आशिष शेलार यांनी केली.

आपला लढा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंबरोबरच आहे. ही अभद्र युती महाविकास आघाडी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मराठी माणसाच्या छातीवर काँग्रेसच्या मुरारजी देसाई, स. का. पाटील यांच्या सरकारने गोळ्या घातल्या. त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने हातमिळवणी केली. पंतप्रधान मोदींचे स्वप्न भारताला विकसित करण्याचे आहे.  तुमच्या सर्वांना उचित न्याय, सन्मान देणे ही माझी जबाबदारी आहे, असा विश्वासही शेलार यांनी दिला. 

 तर आगामी निवडणुकीत जोगेश्वरी विधानसभेवर भाजपाचा झेंडा फडकविणार असल्याचा विश्वास  भाजपाचे विधान परिषेचे गटनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

जोगेश्वरी-पूर्व येथील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रविण मर्गज, विधानसभा अध्यक्ष बाबुभाई पिल्ले, दिगंबर मांजरेकर, मंगेश गुरव, रमाकांत नर, राजेंद्र महागावकर, संजय बने, विलास मेहकर, किशोर मुंडे, आकाश पाटील, अमोल पारधी, राजेश जाधव, कुणाल गावडे, अक्षता राणे, अमृता मोरे, कामिनी दळवी, उमा रमेंडकर, उर्मिला चव्हाण, पौर्णिमा भूमे, श्रद्धय सागवेकर, प्रतिभा ताम्हणकर, रेश्मा गोडके, मृणाली नाईक, दक्षा घोसाळकर, ज्योती गोसावी, मांडवकर ताई यांच्यासह जवळपास ६०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार  अँड.आशिष शेलार आणि प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. 

उद्धव ठाकरे अब की बार भाजपा तडीपार अशी फुसकी जिकडे जातील तिकडे सोडताहेत. पण रविंद्र वायकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले, प्रविण मर्गज आमच्याकडे आले. म्हणजे जोगेश्वरीतून अब की बार उबाठा सेना तडीपार असे म्हणावे लागेल. भाजपा हा खऱ्या लोकशाही मूल्यांवर चालणारा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. हा कुणाचा पारिवारिक पक्ष नाही. या पक्षाचा मालक कार्यकर्ता आहे. कालपासून तुम्ही खासगी पक्षात होता आजपासून तुम्ही सार्वजनिक पक्षात आला आहात, असा टोलाही शेलार यांनी लगावला. 

यावेळी बोलताना दरेकर म्हणाले की, मी जेव्हा पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला तेव्हा कधीही मनसे, राज ठाकरेंवर टीका केली नाही. हे सर्व कार्यकर्ते माझ्या तालमीत तयार झालेले आहेत. पण मी त्यांना कधीही भाजपात या असे म्हटले नाही. तुम्ही ज्या पक्षात आलात त्या पक्षात समाधान, आनंद मिळेल हा विश्वास देतो. मला विधनापरिषदेवर आमदार करा असे मी पक्षाच्या नेतृत्वाला कधीच म्हटले नाही. परंतू पक्षाने, नेतृत्वाने माझ्या कामाची दखल घेऊन आमदार, विरोधी पक्षनेता, गटनेता केले. ही पक्षाची सर्वसमावेशक भुमिका आहे. सर्व प्रथम राष्ट्रहित त्यानंतर पक्ष व नंतर स्वतः हा भाजपा आणि इतर पक्षातील फरक असल्याचे दरेकर म्हणाले. तसेच जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात जे एसआरएसह प्रलंबित प्रश्न आहेत ते निश्चित मार्गी लावू. आपले उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी नानावटी, लिलावती, रिलायन्सच्या धर्तीवर उपनगरात सुसज्ज असे रुग्णालय उभारणार असल्याची ग्वाही दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

दरेकर पुढे म्हणाले की, प्रविण मर्गज हे सहकारात माझ्यासोबत कामं करतात. त्यांनी महिलांसाठी किमान १० संस्था स्थापन कराव्यात. त्या संस्थांद्वारे रोजगार निर्माण करा, असे आवाहनही त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी निवडणुकीत जोगेश्वरी विधानसभेवर भाजपाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष मेढेकर, उपजिल्हा अध्यक्ष दीपक खानविलकर, जोगेश्वरी-पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख उज्वला मोडक, मंडळ अध्यक्ष आनंद परब, माजी नगरसेवक मुरजी पटेल, सुभाष दरेकर आदी उपस्थित होते.