Join us  

‘अदृश्य दहशतवादाचा धोका अधिक घातक’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 9:46 AM

Mumbai: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणि एटीएसने नुकतेच पुण्यात पकडलेल्या काही संशयित आरोपींच्या तपासामधून  देशविघातक शक्तींच्या कारस्थानांचा पर्दाफाश झाला.

मुंबई - राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आणि एटीएसने नुकतेच पुण्यात पकडलेल्या काही संशयित आरोपींच्या तपासामधून  देशविघातक शक्तींच्या कारस्थानांचा पर्दाफाश झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या मूलतत्त्ववादाच्या प्रसाराला आपल्याकडील सुशिक्षित मुस्लीम तरुणही कसे बळी पडताहेत हे पुन्हा एकदा दिसले. त्यामुळे आज संपूर्ण जगाला दहशतवाद्यांकडून होणाऱ्या सोशल मीडियाच्या वापराने हैराण केले आहे. भारत हाही एक त्यापैकी एक बळी असल्याचे निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित सांगतात.

मुंबईतील छाबड हाउसवर, ताज हॉटेलवर २६/११ ला झालेला हल्ला हे याचे उदाहरण होते. अशा ठिकाणी हल्ला करून जास्तीत जास्त लोकांना मारण्याचा यांचा प्रयत्न असतो. टेलीग्राम सारख्या सोशल मीडियावरून त्यांना याबाबतच्या सूचना आणि कार्यपद्धतीबाबतचे मार्गदर्शन केले जाते. दिल्ली, रतलाम आणि पुणे येथे या संघटनेची काही मोड्युल्स दिसून आली आहेत. पुण्यातील मॉड्युलला होस्ट मोड्युल समजले जायचे. नियोजित कामासाठी लोकांना आश्रय देणे, आवश्यक मदत देणे, ते पकडले जाणार नाहीत याची व्यवस्था हे काम पुणे मोड्युलतर्फे केले जात होते. 

आता पकडल्या गेलेल्या संशयित आरोपींचे पूर्वीचे कसलेही रेकॉर्ड किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी उपलब्ध नाही. कारण सोशल मीडियावर कोडवर्डचा वापर करून संदेशांचे आदानप्रदान करण्यावर त्यांचा भर राहिला. ही मोडस ऑपरेंडी जगभरात दिसून आली. सोशल मीडियावरील माहिती एंड टू एंड इन्क्रिप्टेड असल्यामुळे त्याविषयी सहसा कुणालाही पत्ता लागत नाही. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या दहशतवादाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी राष्ट्रा-राष्ट्रांनी माहितीचे आदानप्रदान करायला हवे. आपल्या देशात चार-पाच जणांना पकडून काहीही होणार नाही. त्यांचा मास्टरमाइड जिथे आहे तिथून तो नवी प्यादी शोधून काम सुरू ठेवेल. मुळावर घाव घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य गरजेचे आहे. अमेरिका ज्याप्रमाणे त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेला ठेच पोहोचवणाऱ्या दहशतवाद्यांचा ड्रोनसारख्या अत्याधुनिक प्रणालींचा वापर करून खात्मा करते तशाच प्रकारे आपणही या सर्वांमागचा मास्टरमाइड शोधून त्याच्याविरोधात कारवाई केली पाहिजे. तरच अशा देशविघातक शक्तींना जरब बसेल.

टॅग्स :मुंबई26/11 दहशतवादी हल्ला