Join us  

तिसरा उमेदवार ‘उपेक्षित’ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात जादू काही चालेना

By सीमा महांगडे | Published: April 19, 2024 10:14 AM

मुंबईतील मतदानाची टक्केवारी राज्यातील आणि देशातील इतर मतदानापेक्षा कमी असेलही, पण मतदान करताना त्यांच्या मनात संभ्रम नसतो.

सीमा महांगडे, मुंबई :मुंबईतीलमतदानाची टक्केवारी राज्यातील आणि देशातील इतर मतदानापेक्षा कमी असेलही, पण मतदान करताना त्यांच्या मनात संभ्रम नसतो. कारण मतदान करत असताना प्रमुख दोन उमेदवार कोणते याची खूणगाठ बांधूनच ते आपले मत पारड्यात टाकतात हे गेल्या चार निवडणुकांची उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची आकडेवारी पाहता दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपवाद वगळता तिसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवाराला ५० हजार मतांचा टप्पा ओलांडता आलेला नाही.

उत्तर मुंबईत मागच्या ४ लोकसभा निवडणुकांमध्ये २ वेळा काँग्रेस, तर २ वेळा भाजप विजयी झाला आहे. २०१९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गोपाळ शेट्टींना मुंबईत सर्वाधिक सहा लाखांहून अधिक मते मिळाली होती. मतदारसंघातील जवळपास ७० टक्के मतदान हे गोपाळ शेट्टींच्या बाजूने झाले होते. त्याचवेळी काँग्रेसला २५ टक्क्यांहून अधिक मतदान पारड्यात पाडून घेता आले नाही. 

२००९ साली मनसे फॅक्टर ठरला प्रभावी-

उत्तर मुंबईत २००९ च्या निवडणुकीत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. मनसे उमेदवार शिरीष पारकर यांना या निवडणुकीत एकूण १ लाख ४७ हजार मते मिळाल्याने काँग्रेस विजयी ठरवूनही तो निसटता विजय ठरला. या निवडणुकीत संजय निरुपम यांना एकूण मतदानापैकी ३७ टक्के मते, रामा नाईक यांना ३६ टक्के मते, तर शिरीष पारकर यांना २१ टक्के मते मिळाली होती.

वंचित, आपचा करिष्मा नाही-

भाजप आणि कॉंग्रेस या पक्षाच्या उमेदवारांमधील लढतीमुळे वंचित बहुजन आघाडी आणि आपच्या उमेदवारांना निवडणुकीत आपला करिष्मा दाखवता आला नाही. या दोन्ही उमेदवारांना १५ हजार आणि ३२ हजारांच्या वर मते मिळू शकलेली नाहीत. ही आकडेवारी ३ टक्क्यापेक्षाही कमी असल्याने त्यांचा निवडणुकीत निभाव लागू शकला नाही.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४मतदान