Join us

जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली,त्याला अटक करू ! खोटा कॉल करत शिक्षिकेचीही फसवणूक

By गौरी टेंबकर | Updated: July 5, 2024 14:49 IST

तक्रारदार या जोगेश्वरीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ३१ मार्च रोजी दुपारी त्या कांदिवलीमधील त्यांच्या घरी असताना त्यांना अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप नंबर वरून वॉईस कॉल करत तो पोलीस असल्याचे सांगितले.

मुंबई: तुमच्या जावयाने पोलिसांशी हुज्जत घातली त्यामुळे आम्ही त्याला अटक करणार आहोत, अशी भीती कांदिवलीतील शिक्षिकेला फेक कॉल करत दाखवून त्यांच्याकडून ७० हजार रुपये उकळण्यात आले. याची तक्रार त्यांनी कांदिवली पोलिसात केली आहे. 

तक्रारदार या जोगेश्वरीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, ३१ मार्च रोजी दुपारी त्या कांदिवलीमधील त्यांच्या घरी असताना त्यांना अनोळखी व्यक्तीने व्हाट्सअप नंबर वरून वॉईस कॉल करत तो पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमच्या जावयाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून ते एका मुलीच्या विनयभंगाच्या केसमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली असेही कॉलर म्हणाला. याच प्रकरणात त्यांना अटक करणार असून ती टाळायची असेल तर सांगितलेल्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवावे लागतील. नाहीतर आम्ही त्यांना जेलमध्ये बंद करणार असेही सांगत तक्रारदाराला घाबरवण्यात आले.

त्यानंतर त्याच्याकडून वेगवेगळ्या युपीआय आयडीवर एकूण ७० लाखाची रक्कम उकळत त्यांची फसवणूक केली गेली. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२० आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(सी), ६६ (ड ) अंतर्गत अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.